मुंबई : कोटींच्या अर्थसंकल्पाची तरतूद असणारी मुंबई महानगरपालिका शौचालयांच्या वापरासाठी नागरिकांना लुटत आहे, अशी धक्कादायक बाब घाटकोपरमधील नालंदा नगर परिसरातील नागरिकांनी उघड केली आहे. परिसरातील शौचालयांमध्ये स्वच्छता नसून शौचालयांच्या वापरासाठी घरागिणीस प्रत्येकाकडून १००० ते १३०० रुपये घेतो, अशी तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे. तसेच परिसरातील गटारे साफ केली जात नसल्यामुळे सर्व पाणी आमच्या दारात येते, अशीही व्यथा नागरिकांनी मांडली आहे.
वीज नसल्यामुळे परिसरात चोऱ्या होतात
"परिसरातील गल्ल्यांमध्ये विजेची सोय नसल्यामुळे अनेकदा चोऱ्या होतात. रात्रीच्या वेळी महिलांना घराबाहेर पडण्यास भीती वाटते, " अशी व्यथा येथील काही स्थानिक महिलांनी मांडली आहे. तसेच काही नागरिकांकडे पाण्याचे नळ नसल्यामुळे पाण्याच्यासुद्धा समस्या असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे.
तुम्ही आम्हाला मत देत नाही असे म्हणून नगरसेवक नाकारतात
" आमच्या परिसरातील समस्यांकडे नगरसेवक कोणत्याही प्रकारे लक्ष पुरवत नाही. नगरसेवक नालंदा नगरमध्ये येतचं नाही. परिसरातील समस्या घेऊन नागरसेवकाकडे गेल्यास 'तुम्ही आम्हाला मत देत नाही' असे म्हणून आम्हाला नाकारले जाते. मागील पाच वर्षात नगरसेवकाने आमच्यासाठी काही काम केले नाही. आम्हाला स्वछतागृहांसाठीसुद्धा महिन्याला १२०० ते १३०० रुपये द्यावे लागतात," असा आक्रोश घाटकोपरमधील नालंदा नगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.
- शेफाली ढवण