मुंबई : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही शिक्षण विभागासाठी करण्यात येते. परंतु, असे असूनही बोरिवलीमधील सोडावाला लेन येथील मुंबई महापालिकेची शाळा ही टेकूच्या आधारावर उभी आहे. या संपूर्ण शाळेत जागोजागी टेकू लावून ठेवण्यात आले असतानाही पालिकेच्या ‘ऑडिट’मध्ये मात्र ही शाळा सुरक्षित आहे, असे म्हटले असल्याचे येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले. दि. 6 सप्टेंबर, 1986 मध्ये स्थापना झालेल्या या शाळेची सध्या संपूर्णपणे दुरवस्था झाली आहे. शाळेत अनेक ठिकाणी टेकूचा आधार देण्यात आला आहे.
या शाळेत 1,500 हूनही अधिक विद्यार्थी रोज शिक्षण घेत असतात. असे असतानाही ही शाळा पूर्णपणे टेकूवर उभी आहे. तसेच, मध्ये दुसर्या ठिकाणी वर्ग भरण्याची सोय करण्यात आली होती. परंतु, विद्यार्थ्यांसाठी ते सोयीस्कर नव्हते. पालिकेच्या ‘ऑडिट’मध्ये ही शाळा धोकादायक नाही, असे सांगण्यात आल्याची माहिती येथील शिक्षकांनी त्यांचे नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या शाळेची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी वारंवार केली आहे. 35 ते 36 वर्ष जुनी असणार्या शाळेच्या दुरवस्थेकडे जर पालिका दुर्लक्ष करत असेल, तर अधिक आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करून काय उपयोग, असा प्रश्नही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
लवकरात लवकर शाळेची डागडुजी करावी
बोरिवलीतील मुंबई महापालिकेची ही शाळा टेकूच्या आधारे उभी आहे, असे असतानाही या शाळेला ‘ऑडिट रिपोर्ट’मध्ये धोकादायक नसल्याचे म्हटले आहे. मुळातच टेकूच्या आधारे उभ्या असणार्या इमारतीला धोकादायक नसल्याचे आपण कसे म्हणू शकतो? शाळेत ठिकठिकाणी टेकू लावले असताना येथे वर्ग भरविण्यास कोणत्या प्रशासनाने परवानगी दिली आहे, हे आम्हाला अद्याप कळलेले नाही. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होतो. नुकतीच नवीन सरकारने आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन त्यात सांगितले होते की, मुंबईत धोकादायक असणार्या सर्व इमारतींचे ‘ऑडिट’ करण्यात यावे. परंतु, या इमारतीचे ‘ऑडिट’ नक्की येथील अधिकार्यांनी कशाप्रकारे केले आहे? माझी प्रशासनाला आणि नवीन आलेल्या सरकारला विनंती आहे की, त्यांनी या शाळेकडे लक्ष पुरवावे आणि लवकरात लवकर या इमारतीची डागडुजी करावी.
- राजेश येरुणकर, विभाग अध्यक्ष, दहिसर विधानसभा