‘महाराष्ट्राचे कृषिनायक’ हा ग्रंथ शेतकर्‍यांसाठी दिशादर्शक

‘पद्मश्री’ पोपटराव पवार यांचे ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन राळेगणसिद्धी येथे सरपंच परिषदेचा चौथा वर्धापनदिन सोहळा संपन्न

    24-Sep-2022
Total Views | 148

krishinayak
 
 
राळेगणसिद्धी: “ ‘विवेक व्यासपीठ’ व ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) प्रकाशित ’महाराष्ट्राचे कृषिनायक’ हा सर्व कृषी घटकांचा समावेश असलेला व त्यांच्या यशोगाथांचा समावेश असलेला ग्रंथ आहे. त्यामुळे हा ग्रंथ सर्व शेतकर्‍यांसाठी दिशादर्शक ठरेल. अशाच प्रकारे या संस्थेने राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणलेल्या व ‘रोल मॉडेल’ ठरलेल्या ग्रामपंचायतींवर ग्रंथ प्रकाशित करावा,” असे आवाहन ग्रामविकासाचे प्रवर्तक तथा ‘पद्मश्री’ पोपटराव पवार यांनी केले.
 
 
 
शुक्रवार, दि. 23 सप्टेंबर रोजी ‘ग्रामविकासाची पंढरी’ समजल्या जाणार्‍या राळेगणसिद्धी येथील हिंदवी स्वराज्य संस्थेच्या प्रशिक्षण सभागृहात सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांचा चौथा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी ‘विवेक व्यासपीठ’ व ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) प्रकाशित ’महाराष्ट्राचे कृषिनायक’ ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक, ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे व ‘पद्मश्री’ पोपटराव पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
 
 
याप्रसंगी पाटोदा (जि. संभाजीनगर) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. विकास जाधव, परिषदेचे स्वागताध्यक्ष आबासाहेब सोनवणे, सरपंच महिला प्रदेशाध्यक्षा राणी पाटील, ’कृषी विवेक’चे संचालक आदिनाथ पाटील,’कृषी विवेक’चे समन्वयक विकास पांढरे, ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क)च्या संशोधन माहिती विश्लेषक रसिका गोगटे, पाटोदा येथील सरपंच सुभाष पाटील यांच्यासह राज्यभरातील सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
यावेळी ‘पद्मश्री’ पोपटराव पवार म्हणाले की, “आज ग्रामीण समाजव्यवस्थेपुढे जमिनीचा बदललेला पोत, दुष्काळ, आणि बदलते तापमान हे प्रमुख आव्हाने आहेत. यापुढे जमिनीचा कर्ब वाढविण्यासाठी सरपंचांनी महत्त्वाची भूमिका घ्यावी. पंचायत राज व्यवस्थेमुळे सरपंचांना ग्रामीण विकास करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा सरपंचांनी लाभ घ्यावा,” असेही त्यांनी आवाहन केले.
 
 
‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यावेळी बोलताना म्हणाले की, “संघटनेमध्ये खूप मोठी शक्ती असते. सरपंच परिषदेने राज्यात संघटन वाढवावे, त्यासाठी संघटनेत आचार आणि विचार, शुद्ध असला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी बोलताना ‘कृषी विवेक’चे संचालक आदिनाथ पाटील म्हणाले की, “2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भरडधान्याची लागवड होत असते. नैसर्गिक संकटात ही पीक घेता येते. भरडधान्याचा पौष्टिक आहार म्हणून वापर करता येतो. या धान्याचे मूल्यवर्धन झाल्यास शेतकर्‍यांचा शाश्वत विकास होण्यास मदत होईल. इतर राज्यांत भरडधान्याचे धोरण आहे, असे धोरण महाराष्ट्र राज्य सरकारने अंगीकारले पाहिजे. त्यासाठी ‘पद्मश्री’ पोपटराव पवार व सरपंच परिषदेने पुढाकार घ्यावा,” असेही त्यांनी शेवटी आवाहन केले.
यावेळी माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण विकास, ऊस, ओला दुष्काळ, गावातील गावठाण, जागेची नोंदणी आदी विषयांवर त्यांनी भाष्य केले.
 
 
“कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगतातून प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरपंच परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. राज्यात सरपंचांची पुन्हा थेट जनतेतून निवड व्हावी, यासाठी सरपंच परिषदेने लढा उभा केला. राज्यात फडणवीस-शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या मागणीचा न्याय दिला गेला. हा सरपंच परिषदेचा खरा विजय आहे,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषदेचे आ. श्रीकांत भारतीय यांनी आभासी पद्धतीने परिषदेला मार्गदर्शन केले. परिषदेच्या पुढील वाटचालीस व ’महाराष्ट्राचे कृषिनायक’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
 
 
‘पद्मश्री’ पोपटराव पवार यांना राज्यसभेवर घेण्याची मागणी
 
सरपंच परिषदेत विविध ठराव घेण्यात आले. यामध्ये ‘पद्मश्री’ पोपटराव पवार यांना ग्रामविकासाचे प्रवर्तक म्हणून आणि देशातील सरपंचांचे प्रतिनिधित्व म्हणून राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात यावे, हा मुख्य ठराव मांडण्यात आला. याशिवाय महसूल विभागानुसार विधानसभेत सरपंच प्रतिनिधी म्हणून घेण्यात यावा, सरपंच मानधन, ग्रामपंचायत निधी विषयक ठराव करण्यात आला. या सर्व ठरावांना सरपंच प्रतिनिधीने अनुमोदन दिले.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121