नवी दिल्ली : देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत. एअरटेल पाठोपाठ देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओनेही १५ ऑगस्ट पासूनच ५ जी सेवा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. देशात नुकत्याच पार पडलेल्या लिलावांमधून सरकारला तब्बल १.५ लाख कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानाच्या फायद्या- तोट्यांचाही विचार करणे गरजेचे ठरते.
१ ) देशात सध्या सुरु असलेल्या ४ जी तंत्रज्ञानापेक्षाही या तंत्रज्ञानाचा वेग जास्त असल्यामुळे भारतातील इंटरनेट युझर्सना खूप मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागांतही या सेवेमुळे इंटरनेट सेवा पोहोचवणे शक्य होणार आहे. तब्बल १०० कोटींहून अधिक इंटरनेट ग्राहक असलेली भारतासाठी हे मोठे सुचिन्हच म्हणावे लागेल. ५ जी सेवांमुळे भारतीय इंटरनेट युझर्सना हायपस्पीड सेवा मिळणार आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर कुठलाही व्हिडिओ बफरिंग शिवाय बघणे आता शक्य होणार आहे.
२) ५ जी तंत्रज्ञानांमुळे देशात येऊ घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी तर हे उपकारकच आहे. य तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात ड्रोन सारख्य अत्याधुनिक उपकरणे वापरणे शक्य होणार आहे. मेट्रो सारख्या नव्या वाहतूक व्यवस्थांमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विनचालक चालवणे शक्य होणार आहे.एकूणच या तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
३ ) या ५ जी तंत्रज्ञानाच्या तोट्यांबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात मोठा तोटा हाच आहे की याने इंटरनेट उपलब्धता वाढल्याने त्याचा गैरवापर जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याच बरोबरीने हे तंत्रज्ञान आजही महागडेच राहणार आहे, या क्षेत्रातील सगळीच सेवांची किंमत जास्त असल्याने ते तंत्रज्ञान सामान्यांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध कधी होणार हा अजून एक मोठा प्रश्न आहे.