नाशिक : "आपल्याला ज्यांनी भाषा दिली, भाषेचे ज्ञान दिलं त्यासोबतच ज्यांनी मोठाले ग्रंथ आपल्याला दिले त्या श्री चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ झाले पाहिजे. ही अतिशय योग्य मागणी असून त्यासंदर्भात लवकरच योग्य ती पावलं उचलली जातील.", असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंगळवारी (३० ऑगस्ट) नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव आणि अखिल भारतीय महानुभव संमेलनादरम्यान ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मध्यंतरीच्या काळात शासनाने मुंबईत मराठी विद्यापीठ सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. मात्र ज्या ठिकाणी मराठीच्या पहिल्या ग्रंथााच जन्म झाला, पहिली कविता गायली गेली, मराठीतले साडेसहा हजार ग्रंथ तयार झाले. ज्या ग्रंथांनी संपूर्ण भारतामध्ये अटकेपार मराठीचा झेंडा रोवला. त्या रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच यावर सकारात्मक प्रकारचा निर्णय येईल.",
रिद्धपूर विकास आराखडा निधीसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, "रिद्धपूर विकास आराखड्याला गेल्या अडीच वर्षात निधी मिळालेला नाही. पण आता आपल्या महानुभाव पंथाच्या आशीर्वादाचं सरकार आलं आहे. त्यामुळे रिद्धपूर विकास आराखड्याला निश्चितपणे निधी देऊन काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. महानुभव पंथांना त्यांची स्थानं, त्यांची स्थळं परत मिळाले पाहिजे, या दृष्टीने लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यासंदर्भात पाठपुरावा करणार आहोत."