नाशिक: ( Yoga as a healthy basis for citizens of the world ) “योग विद्या भारतीय परंपरेचा एक भाग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमामुळे योग जगासाठी अमूल्य भेट ठरली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणार्या कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील नागरिक सहभागी होत आहेत. जगातील नागरिकांसाठी योग विद्या आरोग्यदायी आधार ठरली आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ्य आणि कल्याणमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी केले.
केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे शुक्रवार, दि. 2 मे रोजी गौरी पटांगण, नाशिक येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिंडोरी लोकसभेचे खा. भास्कर भगरे, आ. सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, मोरारजी देसाई ‘राष्ट्रीय योग संस्थे’चे डॉ. काशिनाथ समगण्डी, योग विद्या गुरुकुलचे डॉ. विश्वास मंडलिक आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘योग संगम पोर्टल’चे उद्घाटन करण्यात आले.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री जाधव म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्यासाठी योग’ अशी संकल्पना मांडली. त्यामुळे जागतिक आरोग्यासाठी भारत प्रतिबद्ध असल्याचे स्पष्ट होत असून त्यातून जग एक परिवार असल्याची भावना प्रत्येकाने अंगीकारावी. योग दिनाच्या माध्यमातून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना साकारली जात आहे. योग दिन हा एक उत्सव असून यातून मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होत आहे.” आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव डॉ. मोनालिसा दास यांनी प्रास्ताविक केले.
योग हा स्वास्थ्य, संस्कृती आणि एकतेचा संगम
नाशिक शहर अध्यात्म आणि संस्कृतीचे केंद्र असून दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा पार पडतो. हा कुंभमेळा आस्था आणि परपंरेचा संगम आहे. त्याचप्रमाणे योग स्वास्थ्य, संस्कृती आणि एकतेचा संगम ठरेल. त्यामुळेच गोदावरी नदीच्या काठावर योग दिनाचा कार्यक्रम होत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे मंत्री जाधव यांनी सांगितले.