भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांची नियुक्ती
10-Aug-2022
Total Views | 60
नवी दिल्ली : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेदश लळित यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार, केंद्र सरकारने न्या. लळित यांच्या नावास मंजुरी दिली होती. त्यानंतर बुधवारी केंद्रसरकारकडून त्याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश म्हणून न्या. यु. यु. लळित यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षा कमी असणार असून ते नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होतील. देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रामण्णा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर २७ ऑगस्ट पासून न्या. लळित सरन्यायाधीशपदाचा पदभार स्विकारतील. बारमधून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले न्या. लळित हे दुसरे न्यायमूर्ती आहे. न्या. लळित हे तिहेरी तलाकला बेकायदेशीर व घटनाबाह्य ठरविण्याचा निकाल देणाऱ्या खंडपीठाचे सदस्य होते.
त्याचप्रमाणे न्या. लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केरळमधील ऐतिहासिक श्रीपद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी त्रावणकोरच्या तत्कालीन राजघराण्याला अधिकार दिले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पॉक्सो कायद्यांतर्गत 'स्किन टू स्किन' संपर्काबाबतचा मुंबई उच्च न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय रद्द ठरविला होता.