आपल्या घरात आपण साफसफाईसाठी वेगवेगळी प्रॉडक्ट्स वापरतो. फिनेल, तसेच निरनिराळी डिटर्जन्ट्स याचा त्यामध्ये समावेश होतो. पण, यातील किती उत्पादने प्रत्यक्षात फायद्याची असतात? हा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे का?आणि पडला नसेल तर तो आज यानिमित्ताने जरुर पडायला हवा. कारण, या उत्पादनामध्ये वापरल्या गेलेल्या केमिकल्सनी आपल्याला अपाय होऊ शकतो. पण, जर आपल्याला हीच उत्पादने पर्यावरणपूरक आणि कुठलाही धोका नसणारी अशा स्वरुपात उपलब्ध झाली तर ती आपल्यालाही नक्की आवडतील. अशीच पर्यावरणपूरक उत्पादने निर्माण करणार्या ‘स्विफ्टी’ या हायजीन प्रॉडक्ट्स निर्मिती कंपनीच्या सपना बापट आणि शेखर लोखंडे यांच्या उद्योजकीय प्रवासाविषयी...
स्वच्छता हा सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक. पण, याच स्वच्छतेसाठी आपण पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेले पाणी सर्वात जास्त वाया घालवतो. पाणीच जर नसेल, तर कुठलीही जीवसृष्टी जगूच शकणार नाही. परंतु, ज्या पद्धतीने पाणी वाया जात आहे, ती पद्धत चालू राहिल्यास भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणे, अगदीच कल्पनेच्या पलीकडचे नाही. त्यामुळे आपल्याला भविष्यासाठी पाणी वाचवणे महत्त्वाचे आहे. हे पाणी वाचवणे हाच जर आपल्या व्यवसाय बनवणे आणि आपल्या व्यवसायातून समाजासाठी योगदान देणे, हाच या व्यवसायाचा ‘युएसपी’ आहे.
पर्यावरणपूरक उत्पादने हा उद्याचा व्यवसाय. या व्यवसायातून आपल्याला फक्त स्वतःचाच फायदा नव्हे, तर समाजाचा फायदा पण करायचा आहे. त्यामुळे भविष्यासाठी ही उत्पादने खूप महत्त्वाची आहेत. भविष्यात ‘स्विफ्टी’चा व्यवसाय हा देशातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे, हेच प्रमुख ध्येय आहे. कंपनीचे जे मिशन आहे की, ‘हॅप्पी अर्थ’ हे संपूर्ण समाजाचे मिशन बनवणे, हे आमचे सर्वात मोठे ध्येय आहे.
वेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट्स अॅट बेस्ट प्राईज’ या एकमेव उद्देशाने ‘स्विफ्टी’ ही कंपनी काम करते. भविष्यासाठी चांगली उत्पादने निर्माण करणे, यासाठीच शेखर लोखंडे आणि सपना बापट कार्यरत आहेत. त्यांची सर्व उत्पादने ही पर्यावरणपूरक असून त्यामुळे कुठलाही अपाय होत नाही. तसेच कमीत कमी पाणी वापरून स्वच्छता शक्य असल्याने ही उत्पादने सर्वांच्या सोयीचीच अशी आहेत. तसेच या कंपनीचे एकच उत्पादन इतरही बर्याच कारणांसाठी वापरता येणे शक्य आहे. अशीच उत्पादने ‘स्विफ्टी’च्या माध्यमातून तयार केली जातात.
‘स्विफ्टी’च्या निर्मितीआधी शेखर लोखंडे जल पुन:प्रक्रिया क्षेत्रात १८ वर्षे कार्यरत होते. या क्षेत्रात काम करत असताना त्यांना बर्याच हायजीन आणि ‘क्वालिटी मेन्टेनन्स’साठी काम करणार्या अनेक उत्पादनांशी परिचय झाला. परंतु, ही सर्व उत्पादने आयात केलेली असल्याने त्यांच्या किमती खूप जास्त होत्या. पण, त्या तुलनेत त्यांची गुणवत्ता तितकीच चांगली होती. तेव्हा त्यांच्या मनात असा सतत विचार यायचा की, आपल्या देशात अशी उत्पादने कमी किमतीला उपलब्ध करून देता आली तर... याच विचाराने त्यांनी अभ्यास सुरू केला. तसेच ‘वॉटर ट्रिटमेंट’ या क्षेत्रात काम करत असल्याने शेखर यांचा बर्याच कंपन्यांशी संपर्क आला. त्यामध्ये त्यांना असे अनुभवास आले की, सर्व कंपन्यांमध्ये ‘हायजीन’ साठी सर्वात कमी पैसे खर्च केले जातात आणि बाजारात उपलब्ध असलेली कुठलीही उत्पादने ही संपूर्ण स्वच्छता ठेवू शकत नाहीत. त्यामुळे भारतीय कंपन्या या कायम नवीन उत्पादनांच्या शोधात असतात, तर ही दरी भरून काढण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगली सेवा पुरवण्यासाठी आपलेही उत्पादने बाजारात आणावी, या उद्देशाने शेखर आणि सपना यांनी एकत्र काम सुरू केले.
सुरुवातीला त्यांचे कार्यक्षेत्र हे औद्योगिक क्षेत्रापुरेच मर्यादित होते. या क्षेत्राची गरज ओळखून त्यांना सहज वापरता येतील, अशी उत्पादने या दोघांनी तयार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले. कमी पाणी वापरणारी, कमीत कमी केमिकल्स वापरून बनवलेली आणि वाजवी किमतीमध्ये ही उत्पादने मिळत असल्याने लवकरच या उत्पादनांना मागणी वाढायला लागली. आपण आता सर्वच उत्पादने पूर्णपणे ‘ऑरगॅनिक’ बनवू शकत नाही. कारण, त्यामुळे कच्च्या मालाची उपलब्धता आणि किंमत यांचा मेळ घालणे जास्त काळ शक्य होणार नाही. त्यामुळेच ही उत्पादने सध्या ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’चा वापर करून उत्पादित केली जातात. यामुळे ही उत्पादने बनवणे शक्य होत आहे. कोरोना काळाआधी फक्त औद्योगिक क्षेत्रापुरताच त्यांचा व्यवसाय मर्यादित होता, पण आता ‘रिटेल’ क्षेत्राकडे शेखर आणि सपना यांनी लक्ष वळवले आहे. सध्या फक्त ऑनलाईनच उपलब्ध असलेली ही उत्पादने आत हळूहळू छोट्या-छोट्या दुकानांमध्येसुद्धा उपलब्ध व्हायला सुरुवात होईल. सध्या फक्त पुणे आणि आजूबाजूच्या भागांतच उपलब्ध असलेली ही उत्पादने भविष्यात मुंबई, नाशिक तसेच महाराष्ट्रातील इतर भागांतही उपलब्ध होतील.
आत ‘स्विफ्टी’ची उत्पादने वापरण्याचे फायदे कोणते तर? ही सर्व उत्पादने संपूर्णपणे ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’वर आधारित असल्याने या कुठल्याही उत्पादनापासून आपल्याला कुठलाच अपाय होणार नाही. अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले, तर आपण गाडी धुवायला साधारण २५० लीटर पाणी वापरतो, ज्याची गरजसुद्धा नसते, पण जर आपण ही उत्पादने वापरून जर गाडी धुतली तर तीच गाडी फक्त चार लीटर पाण्यात धुतली जाते, इतकी ही उत्पादने प्रभावशाली आहेत. आपल्या घरातसुद्धा आपण फरशी पुसतो, त्यासाठी आपण साधारण प्रत्येक खोलीसाठी एक लीटर अशा दरात पाणी वापरत असतो. पण, जर आपण ‘स्विफ्टी’ची उत्पादने वापरून जर का स्वच्छता केली, तर आपल्याला फक्त एकाच बादलीत आपले संपूर्ण काम करता येईल. परत आपल्याला बाजारातील इतर उत्पादनांपेक्षा कमी प्रमाणातही उत्पादनांची गरज भासते. तसेच ही उत्पादने ‘डायल्यूटेड’ असल्याने आपल्याला जर फक्त ‘फिनेल’ वापरायचे असेल, तर ते ‘डायल्यूटेड’ असल्याने एक लीटर सोल्युशनमध्ये आपण २०० लीटर फिनेल बनवू शकतो. त्यामुळे अतिशय सुलभ अशी उत्पादने आहेत.
कुठलाही व्यवसाय हा समाजासाठी योगदान देणारा असावा. व्यवसाय सुरू करण्याचे गमकच ते असले पाहिजे की, मला काहीतरी योगदान द्यायचे आहे, काहीतरी नवीन निर्माण करायचे आहे. जर ते करता आले, तरच आपला व्यवसाय टिकू शकतो. प्रवाहाबरोबर सगळेच जण जातात, पण प्रवाहाच्या विरोधात जाणाराच यशस्वी होऊ शकतो. जर हेच आपले ध्येय असले, तरच आपण ‘व्यवसाय’ या गोष्टीकडे वळावे, नाहीतर डगमगत्या पायावरचा व्यवसाय कधीच टिकू शकत नाही.
‘स्विफ्टी’ने नुकतीच ‘हॅप्पी अर्थ’ ही संकल्पना पुढे आणली आहे, ज्यातून भविष्यासाठी अशी उत्पादने तयार करण्याचा त्यांचा संकल्प आहे की, ज्यामुळे कमीत कमी पाण्यात आपण जास्तीत जास्त काम करू शकतो. पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला त्याकडे लक्ष देणे भाग आहे. त्यामुळे पर्यावरणसंवर्धन आणि त्याला व्यावसायिकतेची जोड, असा हा अनोखा संगम शेखर आणि सपना यांनी ‘स्विफ्टी’च्या माध्यमातून साधला आहे.
- हर्षद वैद्य