
हैदराबाद: तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील मचन्नपल्ली आणि कोदूर या गावांदरम्यान पावसाळ्यामुळे संपूर्ण मार्ग पावसात पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यामुळे एक खाजगी शाळेची बस एका अंडरपासमध्ये अडकली होती . ही घटना शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी झाली.
मात्र, सर्व मुलांना नागरिकांच्या मदतीने स्कूल बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. महबूबनगर शहरातील भश्याम टेक्नॉलॉजी स्कूलमध्ये जात असताना हा प्रकार घडला . पाण्याची पातळी जास्त असताना बस चालकाने अंडरपास ओलांडल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत तेलंगणामध्ये जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
राज्यासाठी तीन दिवसांचा मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे, ज्यात जगतियाल, राजन्ना सिरसिल्ला, करीमनगर, पेड्डापल्ली, वारंगल (ग्रामीण) आणि वारंगल (शहरी) यांसारख्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून महबूबनगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यभरात मान्सून सक्रिय झाल्याने विविध भागात मुसळधार पाऊस झाला आहे. रंगारेड्डी, मेडचल-मलकाजगिरी, यदाद्री-भोंगीर, कामारेड्डी, जानगाव, राजन्ना सिरसिल्ला आणि जगतियाल या इतर जिल्ह्यांमध्ये लक्षणीय पाऊस झाला.
वायव्य बंगालचा उपसागर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश देखील चक्रीवादळाच्या प्रभावाखाली आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. तेलंगणामध्ये रविवार, दि. 10 जुलैपर्यंत जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळे आणि विजांचा कडकडाट होण्याची अपेक्षा आहे. शुक्रवार, दि. 8 जुलै आणि शनिवार, दि. 9 जुलै रोजी, राज्यातही जोरदार वारे आणि तुरळक मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.