नवी दिल्ली : "हे सरकार सावरकरांचे बगलबच्चे सरकार आहे, पण आम्ही मृत्यूपुढेही न झुकणाऱ्या भगतसिंगांच्या विचारांचे आहोत आम्ही तुरुंगात जायला भीत नाही " असे वादग्रस्त विधान करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सावरकरांवर चिखलफेक करत भाजप सरकारला लक्ष्य केले. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावरून केजरीवाल यांनी आगपाखड करत हे वादग्रस्त विधान केले.
दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाच्या वादग्रस्त धोरणांवरून दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांच्या अहवालात उत्पादन शुल्क मंत्री मनीष शिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. शिसोदिया यांची धोरणे ही मद्यविक्रेत्यांचे भले करून राज्याचे आर्थिक नुकसान करणारी होती असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. याच अहवालाच्या आधारेच राज्यपालांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा कांगावा केजरीवाल यांनी केला आहे. आम आदमी पार्टी अशा कुठल्याही दबावांपुढे झुकणार नाही, आम्ही तुरुंगात जायलाही घाबरत नाही असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. मोदी सरकारकडून सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना निव्वळ राजकीय सूडापोटीच लक्ष्य केले जात आहे, शिसोदिया हे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी दिल्लीच्या शैक्षणिक धोरणाच्या विकासात योगदान दिले आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशा शब्दांत केजरीवाल यांनी शिसोदिया यांची पाठराखण केली आहे.