९४ वर्षांच्या विक्रमवीर आजीबाई

    12-Jul-2022   
Total Views |

devi dagar
 
 
 
वय हा फक्त एक आकडा आहे. धैर्य आणि विश्वास असेल, तर यशाला गवसणी घालणे फार अवघड नाही. जाणून घेऊया ९४व्या वर्षी फिनलंडमध्ये भारताची शान वाढविणार्‍या भगवानी देवी डागर यांच्याविषयी...
 
 
स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तरूण असलेच पाहिजे, असा अजिबात नियम नाही. त्यामुळे यश-कीर्ती संपादनात एखाद्या व्यक्तीचे वय किती आहे, ही बाबही गौण ठरावी. वयाची साठी ओलांडली की,सामान्यतः व्यक्ती म्हातारपणाकडे झुकत असल्याचे बोलले जाते. म्हातारपण म्हटलं की, अनेक कष्टाची कामे करण्यावर मर्यादा येतात. जास्त चालणेही जमत नाही. त्याचप्रमाणे सतत आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे म्हातारपणी व्यक्ती काहीही करू शकत नाही, असा एक समज समाजात रुढ झालेला दिसतो. पण, म्हातारपणी व्यक्ती काहीच करू शकत नाही, हा समज एका महिलेने नुकताच मोडीत काढला. त्या महिलेचे नाव आहे भगवानी देवी डागर.
 
 
भगवानी देवी यांचे वय ५०-६० नव्हे, तर चक्क ९४ वर्षे! दिल्लीतील नजफगढ भागात राहणार्‍या भगवानी यांनी नुकताच एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. फिनलंडमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेत त्यांनी ‘१०० मीटर स्प्रिंट’ अर्थात वेगात चालणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यांनी १०० मीटरचे अंतर फक्त २४.७४ सेकंदात पार केले. या कामगिरीसह त्यांनी राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावावर केला. या क्रीडा प्रकारात २३.१५ सेकंद हा जागतिक विक्रम असून तो मोडीत काढण्यासाठी त्या फक्त एक सेकंद मागे पडल्या; अन्यथा त्यांनी जागतिक विक्रमालाही गवसणी घातली असती. यासोबतच त्यांनी गोळाफेकीसह ‘शॉट पुट’मध्ये कांस्यपदक मिळवले.
विशेष म्हणजे, दिल्ली येथील राज्यस्तरीय स्पर्धेतही तीन सुवर्णपदके तर चेन्नई येथे झालेल्या ‘नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत त्यांनी तब्बल तीन सुवर्णपदके जिंकली होती. त्यांच्या याच विक्रमी कामगिरीच्या बळावर त्यांना फिनलंड येथील ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये प्रवेश मिळाला. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वजण चकित झाले असून, या ९४ वर्षीय आजीबाईंवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुकही केले आहे. भगवानी देवी यांच्या या यशामागे त्यांचा नातू विकास डागर याचाही मोठा वाटा आहे. विकास हा स्वतः एक आंतरराष्ट्रीय ‘पॅराअ‍ॅथलिट’ असून त्याला ‘राजीव गांधी खेलरत्न’ या मानाच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याच्याच आजी असलेल्या भगवानी देवी यांनी फिनलंड येथे मिळवलेल्या यशाने आपणही नातवापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले.
 
 
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये पदक जिंकण्याचे विकास डागर यांचे स्वप्न होते. त्याला अनेकदा यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्याचे जागतिक स्तरावर पदक जिंकण्याचे स्वप्न त्याच्या आजीने पूर्ण केले. भगवानी देवी यांनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावले असून, तिरंग्याची शानही वाढविली आहे. प्रत्येकाच्या यशामागे काही ना काही संघर्ष नक्की असतो. त्याचप्रमाणे अनेक संकटांना तोंड देत भगवानी देवींनी हे यशोशिखर गाठले. त्यात अनेक अडचणी होत्या. त्यातही एका स्त्रीने क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकणे ही काही सोपी गोष्ट नाही. भगवानी देवींच्या पतीचे ६३ वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आली. त्यांनी हार न मानता आपला संघर्ष सुरू ठेवला. छोटी मोठी कामे करत त्यांनी मुलगा हवा सिंह डागर याला मोठं केलं. पतीच्या निधनानंतरही त्यांनी मुलाला शिक्षण देऊन मोठं केलं आणि दाखवून दिले की, एक स्त्रीसुद्धा मुलाची आई होण्याबरोबरच बापही होऊ शकते. त्यांचा नातू विकासने क्रीडा क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल ४० हून अधिक पदके जिंकली आहेत. नातवाचे हे यश पाहून भगवानी देवी यांना राहवले नाही. नातवापासून त्यांनी प्रेरणा घेत वयाचा विचार न करता क्रीडा क्षेत्रात पाऊल ठेवले. भगवानी आजही दररोज चालण्यासह धावण्याचा सराव करतात.
 
 
सरावासह त्या खानपानाकडेही विशेष लक्ष देतात. त्यांना यामध्ये त्यांच्या नातवाची सर्वात जास्त मदत होते. नातवाने दिलेल्या प्रोत्साहनानेच भगवानी यांनी आजतागायत विविध स्पर्धांमध्येही पदकांची लयलूट केली आहे. लहानपणासूनच अनेक जबाबदार्‍या भगवानी देवी यांच्यावर येऊन पडल्या, मात्र त्या डगमगल्या नाहीत. जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली त्यांच्यातील क्रीडा कौशल्य दबून गेले होते. मात्र, नातवाच्या यशाने त्यांना नवी ऊर्जा मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आज त्या देशातील कोट्यवधी महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
 
 
भगवानी देवी या लहानपणी कबड्डी खेळत. कबड्डीची प्रचंड आवड असूनही घरची गरीब परिस्थिती आणि जबाबदार्‍या यांमुळे स्पर्धांमध्ये भाग घेता आला नाही. त्यांना देशासाठी खेळण्याची इच्छा होती आणि त्यांनी ही इच्छा पूर्ण केलीसुद्धा. हिंमत, साहस, आत्मविश्वासापुढे सर्व मर्यादा फिक्या पडतात. याची प्रचिती भगवानी देवी यांच्या प्रवासावरून येते. यश मिळवणे भले अवघड असले तरीही ते तितके सोपंदेखील आहे. जागतिक स्तरावर देशाचा तिरंगा डौलाने फडकविणार्‍या भगवानी देवी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांच्या आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.