मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी (दि. ८ जून) औरंगाबाद येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली. दरम्यान "भाजप औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांचे वडील खासदार मोरेश्वर सावे हे औरंगाबादहून अनेक शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते.", असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिल्याचे गुरुवारी (दि. ९ जून) पत्रकारांशी बोलताना दिसून आले. "मुख्यमंत्र्यांनी संभआजीनगरच्या सभेत अर्धीच गोष्ट सांगितली. अयोध्येला जाऊन आल्यावर माझ्या वडिलांकडून मांडलं जाणारं प्रखर हिंदुत्व शिवसेनेतल्या नेत्यांना आवडलं नसल्याने त्यांनी त्यांचं खच्चीकरण केलं.", असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
"संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी माझ्या वडिलांचा उल्लेख केला. ते कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. पण अयोध्येला जाऊन आल्यावर त्यांनी जे प्रखर हिंदूत्व मांडलं ते शिवसेनेतल्या नेत्यांना आवडले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचं खच्चीकरण केलं. त्यांना साधं लोकसभेचं तिकीटही दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरच्या सभेत अर्धीच गोष्ट सांगितली, ती पूर्ण का सांगितली नाहीत? माझ्या वडिलांना लोकांनी दिलेली धर्मवीर ही पदवी शिवसेनेने का मान्य केली नाही? असा माझा त्यांना सवाल आहे.", असे म्हणत आ. अतुल सावे यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला.