
औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, असे वक्तव्य औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केव्हाही ‘गुडन्यूज’ देतील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव झाले, अशी ‘गुडन्यूज’ ७ जूनपर्यंत द्यावी, अशीच महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे. कारण, मुख्यमंत्र्यांची 8 जूनला औरंगाबाद येथे जाहीर सभा आहे. त्याआधी त्यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले, तर औरंगाबादच्या जनतेसमोर मुख्यमंत्री अभिमानाने उभे राहू शकतील. पण असे होईल का? बहुतेकांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद शहरात दौरा आहे, सभा आहे. औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न पेटला आहे. त्यामुळे कधीकाळी हिंदुत्ववादाचा झेंडा घेणार्या आणि सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणार्या शिवसेनेबद्दल औरंगाबादच्या जनतेला पहिल्याइतके ममत्व वाटत नाही. जनतेचे प्रेम, विश्वास मिळवण्यासाठी, तसेच औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर होणारच, या आशेसाठी तरी लोक सभेला येतील. यासाठी चंद्रकांत खैरेंनी हे नामांतराचे घोडे दामटवले आहे. भलेही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली, तरी त्याबद्दलचा निर्णय भिजतच पडणार. अगदी सध्याच्या महाराष्ट्रातील जनतेच्या नशिबासारखा! यावर काही लोकांचे म्हणणे की, ऐतिहासिक वारसा असलेल्या मुंबईतल्या ‘बीडीडी’ चाळींना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव दिले गेले. ते जितके तत्काळ झाले, तसेच औरंगाबाद आणि उस्मानाबादचेही नाव बदलू शकते. यावर आणखी एक चर्चा अशी की, मग काय झाले? असे तर गांधी आणि नेहरू यांच्या नावाने देशभरात किती सरकारी योजना आणि प्रकल्प आहेत ते पाहा. थोडक्यात अनुभवायचे, तर मुंबईच्या झोपडपट्ट्यांची नावे पाहा. असो. यांना कुणी सांगावे की, औरंगाबादचे संभाजीनगर किंवा उस्मानाबादचे धाराशिव करणे सोपे नाही. कारण, तसे केले तर न जाणे दिल्लीच्या ‘हायकमांड’ आणि बारामतीच्या काकांची खप्पा मर्जी होईल. तसेच औरंगजेबाला बाप मानणारे काहीजण अजूनही महाराष्ट्रात आहेत. अपवाद वगळून तेही एकगठ्ठा मतदान करतात. त्यांना नाराज करून कसे चालेल? खैरेंनी साहेबांना आणि प्रतिसाहेब राऊतांना विचारले का?
वन अॅण्ड ओन्ली राहुल...
मला खूप डिमांड आहे. माझ्या व्हिडिओज्ना तर त्याच्यापेक्षा जास्त डिमांड आहे. यू नो आपला भाव आपणच वाढवायचा असतो. काही काम नसले, तरी खूप कामात आहोत, असे आपण दाखवायचे असते. नाहीतर लोकांना कळेल ना की, अरे हा तर रिकामटेकडा आहे. त्यामुळे मी असा तसा कुणालाही भेटत नाही. जिथे ‘पब्लिसिटी’ होईल, अशाच ठिकाणी जातो. लोकांना माझं महत्त्व कळावं, यासाठी माझी प्रतिमा मी स्वत: बनवतो. आता हेच बघा, पृथ्वीराज चव्हाण अंकलना मी चार वर्षांपासून भेटलो नाही. तिकडे महाराष्ट्रात गेल्यावर पृथ्वी अंकल बोलतच असतील की, हायकमांडना भेटायला गेलो होतो, पण ते खूप ‘बिझी’ आहेत. त्यामुळे ते भेटले नाहीत. मला किती काम असतात सांगू? उन्हाळ्याची चाहुल लागली की, दीदी आणि मी नैनितालला जातो. आम्हाला ना बाकीच्या भारतात असलेली उष्णता अजिबात सहन होत नाही. मग इटलीला नानीकडे, मामाकडे पण जायचे असते. थायलंडसारख्या आर्थिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या देशांनाही भेटीगाठी सुरूच असतात. देशातल्या लोकांना या भेटीगाठी माहिती आहेत. किती ते प्रेम! मी न सांगताही लोकांना माझ्या भेटीगाठी माहिती पडतात. गेल्या महिन्यात असंच एका लग्नामध्ये नेपाळला गेलो होतो. त्या ‘कमळ’वाल्यांच्या भक्तांना काही धरबंद नाही. माझा नेपाळमधला व्हिडिओपण त्यांनी जाहीर केला. आता त्यात काय आक्षेपार्ह होतं? लाईट नव्हते, म्हणून अंधार होता. बाटल्या तिथेच ठेवल्या होत्या, जिथे मी उभा होतो आणि माझ्या सोबत जे कुणी होते, ते पण माझ्या सोबतच होते. त्यात माझी काय चूक? तर असा मी ‘बिझी’ असतो. वेळ मिळाला की, मी मोदी, शाह आणि आता थोडंथोडं योगी यांच्या विरोधातसुद्धा बोलतो. भाजप आणि रा. स्व. संघ, सावरकरांविरोधात पण बोलतो. मी बोलतो म्हणजे, मला आधी सांगितले जाते की काय बोलायचे ते. त्यादिवशी नाही का? चेन्नईमध्ये मी तेथील कार्यकर्त्यांना विचारत होतो, काय बोलायचे आहे? तर त्याचाही व्हिडिओ बनला. इतकी डिमांड मला लोकांमध्ये आहे. मी काहीही केले, तरी बातमी बनते. माझ्यामुळेच तर भाजप पक्ष पण जिंकतो, असे ते ‘कमळ’वाले भक्त खुद्द म्हणतात. मी आहेच, ‘वन अॅण्ड ओन्ली राहुल...’