धोकादायक इमारतींमधील नागरिकांचा जीव टांगणीला

पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव

    30-Jun-2022   
Total Views |


building 
 
 
 
कल्याण : कल्याणच्या रामबाग लेन परिसरात धोकादायक इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येते आणि त्यानंतर थातुरमातूर प्रयत्न केले जातात. मात्र, धोकादायक इमारतींमधील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच राहतो. त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. परिणामी, या इमारतींमधील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. 2010 साली मनपा हद्दीत 684 धोकादायक इमारती होत्या. या धोकादायक इमारती खाली करण्यासाठी मनपाकडून नोटिसा बजावल्या जात होत्या. मात्र, इमारती खाली केल्यावर त्यांनी राहायचे कुठे याचे उत्तर मनपाकडे नव्हते. धोकादायक इमारत पाडल्यास त्यातील भाडेकरु कुठे जाणार आणि गेल्यास नव्या इमारतींमधील आत्ताचे भाडेदेखील परवडणारे नसल्याने हा प्रश्न अधिक जटील होत चालला आहे.
 
 
 
धोकादायक इमारती रहिवासमुक्त करण्यापूर्वी नागरिकांना भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. तीन वर्षांपूर्वी मनपा आयुक्तपदाचा पदभार डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हाती घेतल्यानंतर धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम गतिमान झाली. मनपा हद्दीतील 235 धोकादायक इमारतींपैकी 137 धोकादायक इमारती मनपाने पाडून जमीनदोस्त केल्या व रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र दिले. आता 76 धोकादायक इमारती रहिवासीयुक्त आहेत. त्यामुळे त्या खाली करुनच पाडण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.
 
 
 
....म्हणून पुनर्वसनात अडचणी
 
जागा मालक, भाडेकरु आणि पुनर्विकास करणारा बांधकाम व्यावसायिक यांच्यात एकवाक्यतेचा अभाव ही पुनर्वसनातील प्रमुख अडचण असते. त्यामुळे कोणताही बांधकाम व्यावसायिक पुढाकार घेत नाही. त्यामुळेच पुनर्विकासाचे प्रस्ताव अत्यल्प आहेत, असे नगररचना विभागाकडून सांगण्यात आले.
 
 
 
‘क्लस्टर योजने’चा आराखडा प्रलंबित
धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाकरिता ‘क्लस्टर’ योजना राबविण्याचे जाहीर करूनही 2014 पासून ‘क्लस्टर’चे गुर्‍हाळ सुरूच आहे. आता मनपाने कल्याण-डोंबिवलीसह 27 गावातील 31 ठिकाणी ‘क्लस्टर’ योजना राबविता येऊ शकते, याविषयीचा आराखडा तयार केला, मात्र तोही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
 
 
 
....‘ती’ याचिका अद्याप न्यायप्रविष्ट
2015 साली ठाकूर्लीतील चार मजली मातृछाया ही इमारत भर पावसात कोसळून नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी तहसीलदारांकडून मृतांच्या नातेवाईकांना एक ते दोन लाखांची मदत मिळाली. या दुर्घटनेनंतर ‘राघवेंद्र सेवा संस्थे’चे सुनील नायक आणि महेंद्र साळुंके यांनी उच्च न्यायालयात धोकादायक इमारत प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्याद्वारे धोकादायक इमारतीत राहणार्‍यांसाठी सरकारने योजना राबविण्याची मागणी करण्यात आली. ही याचिका अद्याप न्यायप्रविष्ट असताना बुधवारी पुन्हा कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा भाग कोसळून एक जण दगावल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.