अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आ. बालाजी किणीकर यांच्या कार्यालयात हे पत्र मिळाल्याची माहिती त्यांच्या स्वीय सचिवांनी बुधवार, दि. 29 रोजी दिली.
आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. डॉ. किणीकर सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. दोन दिवसांपूर्वीच अंबरनाथ शहरात किणीकर यांच्याविरोधात फलकबाजी करण्यात आली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पाठिंब्यावरून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. मंगळवारी अंबरनाथमधील एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन केले.
त्यानंतर बुधवारी त्यांच्या अंबरनाथ येथील कार्यालयात निनावी पत्र आले. या पत्रात डॉ. किणीकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, या पत्रावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याचे डॉ. किणीकरांच्या स्वीय सचिवांनी दिली आहे.
पत्रात नेमकं काय?
आमदार बालाजी ‘तेरेको गोली मारने का दिन आ गया हे, हमारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है, इसिलिए तुझे मारनेका हे बता इसलिये रहा हु जब में मारूंगा, वह दिन तय हे तब तक टू रोज डर डर के जिये,’असा मजकूर पत्रामध्ये लिहिण्यात आला आहे. या पत्रानंतर बुधवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलिसांनी आ. किणीकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील संपर्क कार्यालयात धाव घेतली.