बालपणी घरातच भातुकलीऐवजी शिक्षिका बनून खेळणारी मुलगी भविष्यात साहित्यप्रेमी प्राध्यापिका बनते. त्या दीपा ठाणेकर यांच्याविषयी...
मुंबईतील भायखळ्यामध्ये चाळवजा इमारतीतील छोट्याशा घरात 1973 साली जन्मलेल्या दीपा ठाणेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठे यश संपादन केले आहे. वडिलांची नोकरी साधी होती. परंतु, फुलांचे गजरे, वेण्या बनविण्यात त्याचा हातखंडा होता. आई कडक शिस्तीची होती. आई-वडील जास्त शिकलेले नसले तरी त्यांनी दीपा व त्यांच्या भावामध्ये कोणताही भेद न करता शिकवले. यात आईचा प्रभाव जास्त होता, शिस्तबद्ध काम आणि भविष्याची गरज लक्षात घेऊन तिने अनेक गोष्टी शिकविल्या. त्यातूनच समानत्वाची शिकवण मिळाल्याचे दीपा सांगतात.
दीपा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतच झाले, उत्तम नृत्य तसेच त्यांचे पाठांतर चांगले आहे. बालपणी भातुकलीच्या खेळाप्रमाणे घरात आईची साडी नेसून शिक्षिका बनून त्या खेळत. त्यामुळे दहावीनंतर कला शाखेतून पुढील शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले. अक्षर छान असल्याने लेखनाचा व्यासंग जडला. अकरावी-बारावीला तर शिक्षकांनीही त्यांच्यावर वर्गात शिकवण्याची जबाबदारी टाकली होती. घरातून उच्च शिक्षणासाठी हातभार मिळणे कठीण असल्याने ’कमवा-शिका’ या तत्वाने मुंबईतील रुईया महाविद्यालयात नोकरी करून उच्चशिक्षण त्यांनी पूर्ण केले. इथेच अनेक नामवंत मंडळींनी शिकवल्याने तसेच, वाचन आणि नामांकित प्रभूतींची व्याख्याने आदी उपक्रमांमुळे त्यांच्यावर चांगले संस्कार घडले.
‘बीए’, ‘एमए’ केल्यानंतर अंगी काहीतरी कौशल्य असावे म्हणून त्यांनी रत्नागिरीच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयातून ‘बी.एड’ करून पुढे ‘एम.फील’ केले. ‘बी.एड’ प्रशिक्षणात आदर्श शिक्षक कसा असावा, याचा परिपाठ त्यांना मिळाला. त्यानंतर चेतना महाविद्यालय, डॉन बॉस्को स्कूलसह रात्र महाविद्यालयात शिकवू लागल्या. त्यानंतर 1998 पासून झुनझुनवाला महाविद्यालयामध्ये गेली 24 वर्षे त्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
नाव ठाणेकर असले तरी दीपा मुळच्या मुंबईकर. 1998 साली त्या ठाण्यात वास्तव्यास आल्या. घरात कधीही स्वस्थ बसायचे नाही, असा त्यांचा शिरस्ता आजही कायम आहे. मन व्यग्र ठेवण्यासाठी वाचन असो वा अन्य कामकाज, किंबहुना घरातील कामांमध्येही त्या रमतात. इंग्रजीच्या आक्रमणामुळे म्हणा की, पालकांचा इंग्रजीकडे कल वाढू लागल्याने मराठी भाषेकडे अनेकदा विद्यार्थ्यांची पाठ होते. याला आपले सरकारी धोरण कारणीभूत असले तरी अशा मुलांना मराठी भाषा व साहित्य याची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्या नेहमीच कार्यरत असतात. ‘आनंद विश्व गुरुकुल’ या संस्थेतील सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून कोकण मराठी साहित्य परिषदेसाठी केंद्रीय युवाशक्तीसाठी त्या कार्यरत आहेत.
घरातील व्याप सांभाळून भेटीगाठी घेऊन महाविद्यालयातच पहिला मराठी कट्टा सुरू केला. या माध्यमातून मुलाखती, अभिवाचन, बातमीदारी आदींच्या माध्यमातून मराठीच्या प्रसारासाठी ‘कोमसाप’चे विविध उपक्रम सुरू केले. यातून ‘कोमसाप’चे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दादर येथे साकारले. केंद्रीय युवाशक्ती प्रमुख म्हणून जबाबदारी येताच ‘कोमसाप’चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ सरांच्या प्रोत्साहनाने ‘कोविड’ काळात मोठ्या जिद्दीने राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन यशस्वीपणे संपन्न करून दाखवले. त्यांनी आणि ‘कोमसाप’च्या टीमने वेळोवेळी पुढाकार घेतल्याने मराठीचाझेंडा फडकवत ठेवण्याचे ‘कोमसाप’चे कार्य यशस्वीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दीपा आवर्जून नमूद करतात. दीपा मितभाषी असल्या तरी, आवश्यक असेल तिथे मोजक्याच शब्दात त्या आपले म्हणणे मांडतात.
साहित्य क्षेत्रातील परिसंवादात सहभाग, अतिथी, परिक्षक, मुलाखतकार, सूत्रसंचालन यात हातखंडा असलेल्या दीपा निबंधलेखन संपादन, समीक्षण, काव्यलेखन, कथालेखन विविध वृत्तपत्रांमध्ये लेख, नाट्य-पथनाट्य लेखन तसेच अभिनयासह सादरीकरण आणि आकाशवाणीवर कुसुमांजली आदी कला क्षेत्रातही मुशाफिरी करतात. यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले आहे.
युवावर्गाला संदेश देण्याइतकी आपण मोठी नसल्याचे सांगणार्या दीपा युवकांना सोबत घेऊन जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करतात. सहसा उपदेश देणे टाळताना मुलांनी ऐकावेच असा त्यांचा आग्रह नसतो. युवा वर्गाला त्यांचा अनुभवच खूप काही शिकवतो, असे त्या मानतात.
भविष्यात कोकणातील सात जिल्ह्यातील युवावर्गाची मोट त्यांना बांधायची आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मुलांमधील ऊर्जा कामी आणायची आहे. युवाशक्तीची ही धुरा सांभाळण्यासाठी यातीलच एखादी दीपा ठाणेकर अथवा एखादा युवा पुढे यायला हवा, अशी इच्छा त्या व्यक्त करतात. येणारा काळ कठीण आहे, शैक्षणिक धोरण बदलत असल्याने मातृभाषेला नगण्य मानणे मारक आहे. याला युवक जबाबदार नाहीत, असे मतही दीपा मांडतात.
ज्ञानदान तसेच मातृभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच समाजसेवेतही दीपा अग्रेसर असतात. गरजू विद्यार्थ्यांना मदत, ‘थंडरबोल्ड’ संस्थेच्या माध्यमातून अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना भेटी देणे, दिव्यांगांना साह्य करणे आदी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या हरहुन्नरी प्राध्यापिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा !
9320089100