मुंबई: महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील वाढता तणाव लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी शनिवारी दि. २५ जून रोजी मुंबई शहरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे (सीआरपीसी) कलम १४४ लागू केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी १० जुलै पर्यंत कलम १४४ लागू राहणार असल्याचे सांगितले आहे. पक्ष कार्यालये, आणि नेत्यांची निवासस्थाने या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळाचे पडसाद कायदा व सुव्यवस्थेवर होऊ नये यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय साधून सभा आणि राजकीय कार्यक्रम, तसेच हालचालींच्या नियोजन संबंधित माहिती अगोदर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या दरम्यान कोणताही आक्षेपार्ह मजकूर, संदेश, व्हिडिओ पोस्ट करताना आढळलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरू असलेल्या गोंधळामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचलेल्या ४२ शिवसेना आमदारांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. बाळासाहेबांचे शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतलेल्या या मोहिमेमुळे, शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले.