मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. कोठडीत असल्या कारणाने राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही. आपल्याला विधानपरिषदेत मतदान करता यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही नेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने, मलिक व देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. मात्र, अखेर त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली असून बहुतेक आमदारांनी मतदानाच हक्क बजावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करायला लागला असल्याने विधानपरिषदेची निवडणूक मविआसाठी प्रतिष्ठेची समजली जाते. भाजपचे लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे दोन्ही आमदार गंभीर आजारी असून देखील विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी २६ मतांची गरज आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रवाने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे दोन उमेदवार उतरवले आहेत. ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादीला विजयासाठी ५२ मतांची गरज आहे. मलिक व देशमुख यांची मते वगळल्यास राष्ट्रवादीला अगदी काठावर विजय संपादन करता येऊ शकतो परंतु मतदानाची प्रक्रिया गुप्त असल्याने दगाफटका झाल्यास वा एखादं मत बाद झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी देशमुख आणि मलिक यांचे मत महत्वाचे असल्याने दोघांनीही सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली होती.