ठाणे : वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील लोकमान्य पाडा नं. १, आकृती गृहसंकुलाच्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे निवडणुकीच्या तोंडावर नामकरण करून अडीच वर्ष लोटले तरीही अद्याप हा जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही, अशा पद्धतीने हा जलतरण तलाव बंद राहिल्यास येथील सामानाची नासधूस होण्याची शक्यता आहे. तसेच,येथील रहिवाशांसाठी हा जलतरण तलाव सुरू झाल्यास त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे व रामा साळवी जलतरण तलाव येथील फेरा ठळणार आहे. त्यामुळे हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी मनसेच्यावतीनेकरण्यात आली असून, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत आक्रमक होत याप्रश्नी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना मनसेच्यावतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
वर्तकनगर प्रभाग समितीच्या अंतर्गत येणार्या या जलतरण तलावाचे ‘स्व. रामचंद्र ठाकुर तरणतलाव’ असे नामकरण करण्यात आले होते. २०१९ ला निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे नामकरण करण्यात आले. वर्तकनगर, लोकमान्य नगर, शिवाई नगर, शास्त्रीनगर, चिराग नगर, भिमनगर या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या जलतरण तलावाचा आजतागायत लाभ घेता आलेला नाही. ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही जलतरण तलाव सर्वसामान्यांना खुला करण्यात आलेला नाही. वास्तू बंद असल्यामुळे योग्य निगा राखली जात नाही. तरी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालत व संबंधित विभागाला जलतरण तलाव खुला करण्याचे आदेश द्यावेत,” अशी मागणी मनसेचे विभागअध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
अनावरणानंतर वास्तू धूळखात
वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत अशाच पद्धतीने अनेक वास्तूंचे केवळ अनावरण केले जाते. त्यानंतर या वास्तू धूळखात पडण्याची मोठी मालिकाच या समिती परिसरात दिसून येते. त्यामुळे या वास्तूंचे अनावरण होताच त्या नागरिकांसाठी खुल्या कराव्यात. जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा वापर करता येईल.
- संदीप पाचंगे, विभाग अध्यक्ष, मनसे