आसाम: मागील काही तासांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे आसाममध्ये १२ तर मेघालयात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या २८ जिल्ह्यातील १९ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर, १ लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
आसामच्या होजाई जिल्ह्यातील रायकाटा येथे पुरात अडकलेल्या २४ जणांना इस्लामपूर भागात पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या छावण्यांकडे नेणारी नौका कोपिली नदीत अचानक उलटली. या दुर्घटनेतील तीन मुले बेपत्ता झाली आहेत. बेपत्ता मुलांचा शोध सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
आसामच्या सुमारे ३ हजार गावांना पुराने वेढले आहे. ४३ हजाराहून अधिक एकर पिकांची नासाडी झाली आहे. ब्रह्मपुत्रा, गौरांग, कोपिली, मानस आणि पगलाडिया नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दक्षिण आसाम, त्रिपुरा आणि मिझोरामला जोडणाऱ्या रस्त्याचा एक भाग भूस्खलनात वाहून गेल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी फोनवरून चर्चा करून पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी केंद्राकडून मदतीचे आश्वासन देखील देण्यात आले. आसाम सरकारने पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या लोकांसाठी गुवाहाटी सिल्चर येथे विशेष उड्डाणाची सोय केली आहे.