‘दो गज की दुरी’ यशाचे गमक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2022   
Total Views |
social
 
 
एकीकडे संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा उद्रेक शांत होत असताना, किंबहुना तो अनेक देशांमधून हद्दपार होत असताना खुद्द चीनमध्ये मात्र परिस्थिती भीषण होत चालली असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः शांघायमध्ये ‘डायलिसिस’सारख्या अत्यंत नित्य गरजेच्या गोष्टींसाठीही रुग्णालयात जाता येत नसल्याची बाब समोर येत आहे.
 
  
शांघायमध्ये इतकी कडक संचारबंदी असून तास-दोन तासांचा वेळ नागरिकांना मिळत आहे. संचारबंदी उघडली जाते, तेव्हा दुकानांसमोर प्रचंड मोठ्या रांगा दिसत आहेत. संपूर्ण जनता त्रस्त आहे. अन्नधान्याचा, रोजच्या वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळेच की काय, लोक आता ‘बार्टर सिस्टीम’च्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यांनी आता गटागटाने समूह खरेदीसुद्धा सुरू केली आहे. शांघायचे रस्ते ओसाड पडले आहेत. जग ‘कोविड’मधून बाहेर पडत असताना, ‘मास्क फ्री’ असण्याचा आनंद उपभोगत असताना शांघायमध्ये मात्र कडक ‘लॉकडाऊन’ आहे. खरेतर आतापर्यंत चीनने हा विषाणू किती उत्तमरित्या ‘मॅनेज’ केला, याचे वर्णन पाश्चात्य माध्यमे करत होती. ‘कोविड’ आला त्या वेळी संपूर्ण जग ‘कोविड’ची लढाई हरणार; भारताला ती लढता येणार नाही; इथली आरोग्य व्यवस्था खिळखिळी आहे; इथे लस नाही; मास्क नाही; ‘पीपीई किट’ नाहीत; ‘व्हेंटिलेटर’ नाहीत; ऑक्सिजन नाही, अशी जोरदार हाकाटी पाश्चात्य माध्यमांनी केली होती. पण आज काय परिस्थिती आहे? आज भारत दर महिन्याला निर्यातीचे उच्चांक गाठत आहे. ‘जीएसटी’चे संकलन दर महिन्याला १.५ बिलियन डॉलर्स इतकं प्रचंड वाढत आहे आणि शांघाय मात्र ‘लॉकडाऊन’मध्ये बंद आहे.
 
 
चीनमध्ये ‘कोविड’ संक्रमणाचा सामना करण्यासाठी ‘झिरो कोविड’ पॉलिसीचा अवलंब करण्यात आला होता. शांघायमधील अवस्था इतकी बिकट आहे की, लोकांना लागणार्‍या गोष्टी पुरवण्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेवला आहे. त्यात सरकारी यंत्रणा साफ कोसळली असल्याचे दिसून येत आहे.कोरोनाला दोन वर्षे झाली, तरी चीन एक प्रकारे गुडघ्यावर आला असल्याचे दिसून येत आहे. ‘लॉकडाऊन’ हा तेथील रोजचाच भाग झाला आहे. आयात-निर्यात बंद झाली आहे. चार आठवड्यांपासून संपूर्ण शांघाय शहर एका विलगीकरणामध्ये म्हणजे इतर जगापासून तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे.शांघायमध्ये आतापर्यंत केवळ आठ ते दहा मृत्यू झाले, असा दावा चिनी प्रशासन करत असले, तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे ‘ओमिक्रॉन’चा प्रसार आपल्या प्रतिकाराच्या गतीपेक्षा जास्त होऊ नये म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न सध्या चिनी प्रशासन करताना दिसत आहे.
 
 
 
दुसरी बाब म्हणजे, भारतात विरोधी पक्षांनी लसविरोधी प्रचार करूनही लसीकरणाचे जागतिक उच्चांक आणि मानांकन प्रस्थापित केले. पण आज चीनमध्ये काय अवस्था आहे? चीनमध्ये बहुतांश वयस्कांनी लस घेतलेली नाही. हाँगकाँगसारख्या एका छोट्या बेटावर आज जवळपास दहा लाख रुग्ण आहेत आणि मागच्या काही महिन्यांमध्ये आठ हजार लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. मग तेवढ्याच लोकांना बाधा होऊन शांघायमध्ये फक्त आठ ते दहा मृत्यू झाले, यावर विश्वास कसा ठेवायचा? चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे वर्चस्व आहे. आतापर्यंत ज्या ‘झिरो कोविड’ पॉलिसीबद्दल त्यांनी प्रचंड कौतुक करवून घेतले होते, त्याचा बुरखा मात्र आता फाटला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
 
आजपर्यंत इतर देशांना अक्कल शिकवणारा चीन स्वतः मात्र ‘कोविड’ पसरत असताना चाचपडताना दिसत आहे. आज चीनमध्ये अनेक ‘मल्टिनॅशनल’ कंपन्यांची ‘मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स’ आहेत. तिथून तयार प्रॉडक्टसचा पुरवठा न झाल्यामुळे युरोप, अमेरिका आणि आशियाच्या मार्केटमध्ये आज चीनचा थंडावलेला ‘परफॉर्मन्स’ दिसत आहे. त्यात पुन्हा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग २०२२ च्या अखेरीला आपल्या तिसर्‍या निवडणुकीसाठी सज्ज होणार आहेत. पुन्हा आपणच राष्ट्राध्यक्ष व्हावे, असे तर त्यांना निश्चितच वाटत असणार. पण त्यासाठीची पार्श्वभूमी फारशी योग्य नाही. ‘झिरो कोविड’ ही पॉलिसी योग्य होती का? याचा फैसला आज जगासमोर झाला आहे. ‘दो गज की दुरी हैं जरूरी’ असे म्हणणारा भारत या प्रक्रियेत यशस्वी झाला असल्याचे समोर येत असून भारताच्या यशाचे गमक आता जगासमोर यशस्वीपणे येत आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@