उद्धव ठाकरेंनी बाबरी ढाँचा पाडल्याच्या गमजा मारणे सोडून घरातच बसून राहावे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संगतीला गेलेल्यांना त्याहून निराळे काही करता येणार नाही. कारण, या दोन्ही पक्षांनी नख्या काढून दात, पाडून शिवसेनेला शोभेचा वाघ केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या डरकाळीने तेच सांगितले अन् नकली वाघ धाराशायी झाले.
बाबरी ढाँचा पाडल्याचा डांगोरा पिटणार्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या तोंडात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सत्य आणि तथ्याचा असा काही बोळा कोंबला की, शिवसेनेच्या खोटारडेपणाचा कोथळाच निघाला. दि. ६ डिसेंबर, १९९२ रोजी पारतंत्र्याची निशाणी असलेला बाबरी ढाँचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता अयोध्येत नव्हता, असे देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले. त्यात काहीही चुकीचे नाही. कारण, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य श्रीराम मंदिराची उभारणी करण्यासाठी हिंदू धर्मीयांनी शेकडो वर्षे परकीय आक्रमकांविरोधात लढा दिला. स्वातंत्र्यानंतर आधुनिक युगात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपने अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी आदींच्या नेतृत्वात श्रीराम मंदिर निर्मितीचा शंखनाद केला. त्यासाठी रथयात्रा सुरू केली, कारसेवा केली. पहिल्या कारसेवेवेळी मुल्ला मुलायमसिंहांनी अयोध्येत दाखल झालेल्या कारसेवकांवर गोळ्या झाडल्या. त्यात अनेकांचा मृत्यूही झाला. अनेकांना तुरुंगातही डांबले व त्यात देवेंद्र फडणवीसही होते. पण, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपने श्रीरामजन्मभूमीस्थळावरील श्रीराम मंदिराची मागणी सोडली नाही.
दुसर्या कारसेवेवेळीही समस्त हिंदू धर्मीयांनी या संघटनांच्या नेतृत्वाखालीच बाबरी ढाँचाला धडक मारली आणि बाबरी ढाँचा जमीनदोस्त केला, त्यानंतरच्या आरोपपत्रातही या संघटनांच्या नेत्यांचीच नावे होती. पण, त्यावेळी तिथे शिवसेनेचे नेते नव्हते. तत्पूर्वी मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर अयोध्येत आले होते, नाही असे नाही. मात्र, राहायला हॉटेल न मिळाल्याने व कारसेवक थांबलेल्या पटांगणात तंबू ठोकून राहणे कमीपणाचे वाटल्याने ४ डिसेंबरलाच शिवसेनेचे नेते अयोध्येतून कोलकात्याला निघून गेले होते. त्यानंतर दोन दिवसांनी बाबरी ढाँचा उद्ध्वस्त करण्यात आला. त्याचे श्रेय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजपने स्वतः न घेता ते सर्व कारसेवकांना दिले, तर शिवसेनाप्रमुखांनीही जर-तरचीच भाषा वापरली होती. तरीही उद्धव ठाकरे, संजय राऊत व शिवसेना बाबरी ढाँचा पाडण्याचे काम आम्हीच केल्याचे म्हणत असतील, तर तो कारसेवकांचाच नव्हे, तर प्रभु श्रीरामाचाही अवमानच!
दरम्यान, मशिदींवरचे बेकायदेशीर भोंगे काढायला सांगितले, तर ज्यांची हातभार फाटली, त्यांनी बाबरी ढाँचा पाडल्याचे दावे करणे हास्यास्पद असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते खरेच. कारण, मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याचा फक्त हिंदू धर्मीयांनाच नव्हे, तर सर्व समाजाला त्रास होतो. त्यामुळे राज ठाकरेंसह हिंदू धर्मीयांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे हटवण्याची, त्यांचा आवाज कमी करण्याची मागणी केली. तसे न केल्यास हिंदू हनुमान चालीसा लावून प्रत्युत्तर देतील, असा इशाराही दिला. त्यात काही वावगे म्हणता येणार नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच असते. सरकारकडून फक्त मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू असेल अन् हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारला जात असेल, तर हिंदूंचा संताप होणे साहजिकच. ठाकरे सरकारच्या काळात सध्या तेच सुरू आहे. मुस्लिमांनी रमजान महिना सुरू असताना किंवा एरवीही रस्ते, चौक अडवून, वाहतुकीला अडथळा करून नमाज पठण केले, सर्वोच्च न्यायालय, विविध उच्च न्यायालयांच्या निर्णयांचे व ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करून कर्कश आवाजात भोंग्यांवरून दिवसभर बांगा दिल्या तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. पण, हिंदूंनी हनुमान चालीसा म्हणण्याची नुसती घोषणा केली तरी शिवसेनापक्षप्रमुख मुख्यमंत्री असलेल्या सरकारकडून त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात गजाआड केले जाते.
मशिदींवरील भोंग्यांविरोधात हिंदूंनी आवाज उठवला, तर महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचा फार्स केला. पण, मशिदींवरील भोंगे काढण्याची जबाबदारी न घेता तो मुद्दाही केंद्राकडे ढकलण्याचे काम ठाकरे सरकारच्या गृहमंत्र्यांनी केले. अर्थात, मंत्रिमंडळाचे प्रमुख उद्धव ठाकरे असल्याने तो निर्णय मुख्यमंत्र्याचाच आहे. मशिदींवरील भोंगे काढण्याचा मुद्दा निघाला, तर तथाकथित वाघाची तंतरल्याचे यातून पाहायला मिळाले. त्या उद्धव ठाकरेंनी बाबरी ढाँचा पाडल्याच्या गमजा मारणे सोडून घरातच बसून राहावे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संगतीला गेलेल्यांना त्याहून निराळे काही करता येणार नाही. कारण, या दोन्ही पक्षांनी नख्या काढून दात, पाडून शिवसेनेला शोभेचा वाघ केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या डरकाळीने तेच सांगितले अन् नकली वाघ धाराशायी झाले.
दरम्यान, एकेकाळच्या हिंदुत्ववादी प्रतिमेच्या आणि आता हिंदूंनाच लाथा मारणार्या शिवसेनेवर ताबा मिळवणार्या शरद पवारांवरही देवेंद्र फडणवीसांनी शरसंधान साधले. राज्यात मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे आणि हनुमान चालीसाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर हिंदूंना अक्कल शिकवण्यासाठी शरद पवारांनी तोंड उघडले. हनुमान चालीसा म्हटल्याने बेरोजगारांचे प्रश्न सुटणार आहेत काय, असा सवाल त्यांनी केला.
हनुमान चालीसा म्हटल्याने रोजगाराची काळजी मिटेल न मिटेल हा वेगळा विषय, पण त्यामुळे कोणत्याही संकटाने खचून गेलेल्या, निराश झालेल्यांच्या मनांना उभारी मिळेल हे नक्की. विविध अभ्यासकांनी व तज्ज्ञांनी शब्दब्रह्माच्या ताकदीचे महत्त्व मान्य केलेले आहे. अर्थात, ते शरद पवारांना समजणार नाही. त्यांना फक्त फरची टोपी घालून इफ्तार पार्ट्या कशा झोडायच्या हे समजते. पण, शरद पवारांच्याच भाषेत इफ्तार पार्ट्या झोडल्याने तरी कुठे बेरोजगारांचे प्रश्न सुटलेत? शरद पवार वर्षानुवर्षांपासून रमजानमध्ये मुस्लिमांच्या इफ्तारमध्ये मोठ्या रुबाबात जात असतात, तिथेही भाषणेही ठोकत असतात. तेव्हा शरद पवारांना कधी असे वाटले नाही का की, याचा बेरोजगारांसाठी काय उपयोग? सर्व धर्मीयांच्या नाही, पण मुस्लिमांच्यासाठी तरी काय उपयोग? तर काहीच नाही. हमीद दलवाई आपले मित्र असल्याचे शरद पवार सांगत असतात. पण, हमीद दलवाईंच्या विचारांचा जागर करण्यासाठी तरी शरद पवारांनी इफ्तार पार्ट्यांकडे विधायक दृष्टीने पाहिलेय का... आज मुस्लीम समाजातही अनेक प्रश्न आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, दहशतवादाकडे ओढा, असे त्यांचे स्वरुप आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवारांसारख्या ज्ञानी माणसाने इफ्तार पार्ट्यांचे माध्यम वापरायला हवे होते. पण, त्यांनी तसे कधी केल्याचे दिसले नाही. त्या शरद पवारांनी हिंदूंना हनुमान चालीसा पठणापासून रोखणे म्हणजे, आपला तो बाब्या अन् दुसर्याचे ते कार्टे, असाच प्रकार. मतपेटी असल्याने मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायच्या अन् हिंदू मतपेटी नसल्याने त्यांच्यात संशय निर्माण करायचा, फूट पाडायची असा हा शरद पवारांचा कावा आहे. पण, त्याला कधीच यश येणार नाही. कारण, देवेंद्र फडणवीसांसारखे नेते शरद पवारांचा मुखवटा फाडून खराखुरा चेहरा दाखवण्याचे काम करतच राहतील.