आधुनिक कालिदास : स्वातंंत्र्यवीर सावरकर

    27-May-2022
Total Views | 236

सावरकर
 
 
 
‘आधुनिक काळातील कालिदास’ अशीच पदवी ज्यांना शोभून दिसेल, असे कविवर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांच्या कवितेत फक्त देशप्रेमच नाही, तर कारुण्यरस, वीररस ज्वलंत भावनेने दिसून येतात. सावरकरांच्या कवितांचे जर वर्गीकरण केले गेले, तर त्यामध्ये देशप्रेम, विरह, स्तुतीपर काव्य असे वेगवेगळे भाग करता येतील. यातील काही कवितांमधले भाव तर इतके तरल आहेत की, ही कविता त्यांनी अंदमानसारख्या भीषण परिस्थितीत लिहिली असेल, असं वाटत नाही.
 
 
सकल जगामधिं छान।
अमुचा प्रियकर हिंदुस्थान।
केवळ पंचप्राण अमुचा सुंदर हिंदुस्थान॥
“सकल जगामध्ये अमुचा हिंदुस्थान आम्हाला प्रिय आहे. अहो, तो आमचा फक्त जीव नसून आमचा पंचप्राण आहे,” हे ज्वलंत शब्द दि. २९  डिसेंबर, १९०८  साली लंडन येथे गायले गेले. त्या कवितेचे कवी होते स्वातंत्र्यवीर सावरकर!
‘आधुनिक काळातील कालिदास’ अशीच पदवी ज्यांना शोभून दिसेल, असे कविवर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांच्या कवितेत फक्त देशप्रेमच नाही, तर कारुण्यरस, वीररस ज्वलंत भावनेने दिसून येतात. सावरकरांच्या कवितांचे जर वर्गीकरण केले गेले, तर त्यामध्ये देशप्रेम, विरह, स्तुतीपर काव्य असे वेगवेगळे भाग करता येतील. यातील काही कवितांमधले भाव तर इतके तरल आहेत की, ही कविता त्यांनी अंदमानसारख्या भीषण परिस्थितीत लिहिली असेल, असं वाटत नाही. अंदमानमध्ये रचलेले ‘कमला’, ‘विरहोच्छवास’ असे काही कवितासंग्रह वाचले की, मनातून आपण थक्क झालेलो असतो. त्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील सावरकर ‘तनूवेल’ नावाची कविता लिहितात! तिचे बोल आहेत, ‘सकाळीच तू तोडीस असता, जाईजुईच्या फुलां, माडीवरूनी सुंदर कन्ये पाहियले मी तुला!’ इतके स्वच्छ, तरल भाव असलेली कविता कोणी आज करू जाणेल, तर त्यालादेखील ही कविता नक्कीच प्रेरणा देऊन जाईल.
 
सावरकरांचे ब्रिटिशांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष असे. ब्रिटिशांनी शस्त्रबंदीचा कायदा केला त्याला विरोध करताना ‘आमचे देवही आत्मरक्षण करण्यासाठी शस्त्रे हातात घेऊन आहेत,’ असे ते ठणकावून सांगतात. ‘व्याघ्र, नक्र, सर्प, सिंह हिंस्र जीव संगरी, शस्त्रशक्तीने मनुष्य हा जगे धरेवरी’ या शस्त्रगीतात ते शेवटी शस्त्रबंदी मागे घेण्यासाठी आवाहन करतात. ‘शस्त्रबंधने करा समस्त नष्ट या क्षणा, शस्त्रसिद्ध व्हा झणीं, समर्थ आर्त-रक्षणा...’ स्वदेशीचा आग्रह धरणार्‍या सावरकरांनी स्वदेशीचा ‘फटका’देखील लिहिला. त्यात ते म्हणतात, “तुम्हीच तुमची अनास्था करुन घेतली आहे. मग, तुमच्याकडे असलेल्या कलादेखील कशा तुमच्याकडे शाबूत राहतील? तुमचे धन हिरावून घेऊन गेले. आता तुम्ही मेला, तरी तुमच्यावर रडणारे कोणीतरी शिल्लक आहे का?” आपलाच कच्चा माल घेऊन त्यावर युरोपियन देशात प्रक्रिया केली जाते व त्या वस्तू आपल्याला विकल्या जातात. त्यातून परकीय पैसे कसे कमावतात, यावर पण एक कडवे या फटक्यात दिसते. आपल्या देशाची दुरवस्था झालेली बघून त्यांना दुःख होत असे. त्यांच्या एका कवितेत ते लिहितात, “गेला अहो देश रसातळाला, स्वातंत्र्य प्रासाद अहा जळाला, आला परांचा अति थोर घाला, व्हा सज्ज तुम्हांस लुटू निघाला.” ‘दिवाळीचे लक्ष्मीपूजन’ या कवितेत ते स्वदेशीचा प्रसार करण्याचे सुचवतात व म्हणतात, “स्वदेशलक्ष्मी पुजूं साधुनि जरी मंगल वेळ, गजांतलक्ष्मी हिंदुहिंदूच्या दारी डौलेल...”
 
सावरकर शीघ्रकवी होते. नाशिकला ‘प्लेग’चा प्रादुर्भाव जाणवत असताना सावरकर कुटुंबीय कोठुर येथे राहिले होते. त्यावेळी ‘गंगावकिली’प्रमाणे ‘गोदावकिली’ त्यांनी लिहिली. नाशिकमधील नारोशंकर देवालय बघून त्यांनी ‘नारोशंकराचे देवालय’ ही कविता रचली. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिण्याचे श्रेयदेखील सावरकरांकडे जाते. त्याचप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे व तानाजी मालुसरे यांचा पोवाडादेखील त्यांनी लिहिला. तसेच बखरी वाचून त्यातील वर्णनाप्रमाणे पेशव्यांच्या काळात रंगपंचमी कशी साजरी केली जात असेल, याचा एक ‘फटका’देखील त्यांनी लिहिला. त्यात सवाई माधवरावांचे वर्णन करताना त्यांनी ‘धन्य कुलामधी धनी सवाई भाग्य धन्यची रायाचे, सेवक हाती यशस्वी असती, पुण्य किती त्या पायांचे...’ असे समर्पक शब्द वापरले आहेत. नाशिकवरुन कोठुरला बैलगाडीतून जाताना गाडीला जोडलेल्या बैलाला पाहून त्यांच्या मनात जे विचार आले, ते ‘वृषोक्ति’ या काव्यात आढळतात. हे काव्य संपताना जणू बैलच म्हणतो की, “मी तर माझ्या शिंगाने हे जोखड दूर करू शकतो, पण तुमच्या देशाला स्वातंत्र्य तरी कुठे आहे? तुम्ही तरी कुठे स्वतंत्र आहात,” असे प्रश्न विचारतो. मुंबईच्या हिंदू युनियन क्लब येथे दिलेल्या एका कवितेत त्यांनी बालविधवांचे दुःखद वास्तव मांडले आहे. ते द्रष्टेपणाने विचार करत. हताश आणि निरस अशा वर्तमानकाळाला त्यांनी त्याचे भविष्य सांगितले. ते म्हणतात, “होऊनिया मुक्त स्वतः करील ती जगता, ममतेच्या समतेच्या सृजन रक्षणाला...”
 
 
 
लंडनमध्ये असताना सावरकरांनी ‘प्रियकर हिंदुस्थान’ , ‘प्रभाकरास’ , ‘सागरास’ अशा विविध कविता लिहिल्या. ‘प्रियकर हिंदुस्थान’मध्ये आमच्या देशाशी शत्रुत्वाने वागणार्‍या लोकांसाठी ते लिहितात, ‘शत्रू-कंठ भंगोनी घालू तुज दारुण रक्तस्नान.’ लंडनमध्ये असलेल्या सावरकरांना आपला पहिला मुलगा प्रभाकर गेल्याचे कळले, तेव्हा ‘प्रभाकरास’ अशी कविता लिहिली. पण, कविता लिहिताना त्यांना प्रभाकरचा चेहरादेखील आठवेना. म्हणून त्यांचे शब्द असे उमटले की, “नवप्रसव जननी मजला दावीत असता रे, गुरुजन मर्यादेने म्यां बहुत पाहियले नाही.” पुढे ब्रायटनच्या किनार्‍यावर मन विषण्ण झाले असताना हिंदुस्थानातील त्यांच्या बालपणीच्या मित्रांची, आपल्या कुटुंबाची आठवण येऊन त्यांनी ‘सागरास’ अशी कविता लिहिली. आपल्या भारताची आठवण होऊन ते लिहितात, “या देशात कितीही मोठमोठे महाल असले, तरी मला आईची झोपडी जास्त प्यारी आहे. तिच्याविना मला राज्य नको, तर तिच्या वनातील वनवासी होऊन मी आयुष्य आनंदाने जगेन.” या क्रांतिकार्यात त्यांनी आपलीच नाही, तर घरादाराची होळी केली म्हणून ते लिहितात, ‘त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता, दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता.’
 
 
 
रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध असताना त्यांनी अनेक कविता लिहिल्या. त्यांचा मुख्य हेतू हिंदूंना एकत्र करणे हा होता. अशाच एका कवितेत ते म्हणतात, “तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवची पिता आपुला, चला तया वंदू...” अशा पद्धतीने हिंदूंचे एक एकतागान लिहून त्यांनी आपापसात असलेल्या भेदांना मूठमाती देण्याचे काम केले. याच दरम्यान आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचे वर्णन करताना ते ‘अखिल हिंदू विजय ध्वज गीत’ लिहितात. रत्नागिरी जिल्ह्यात विठ्ठल मंदिरात सर्व हिंदूंना प्रवेश मिळवून देताना ते लिहितात, “तुम्ही देवाच्या येऊ दिलेती दारी, आभार जाहले भारी, हे सुतक युगांचे फिटले, विधिलिखित विटाळही मिटले...”
 
 
सावरकरांनी त्यांच्या हयातीत अशा अनेक कविता लिहिल्या. त्यांच्या प्रत्येक कवितेत आपल्याला काहीना काही बोध मिळतो. त्यांची कविता वाचताना कधी परमोच्च आनंद प्राप्त होतो, तर कधी त्याच आनंदात रडूदेखील येते. त्यांच्या ‘सायंकाळी रानात चुकलेले कोकरू’ वाचताना आपल्याला ते कोकरु आईकडे गेले म्हणून हर्ष होतो, तर पुढे सावरकर विचारतात की, ‘माझी आई मात्र अजून हरवली आहे.’ त्यावेळी झटकन आपल्याला कवितेचा भाव लक्षात येतो. त्यांची काव्यप्रतिभा डोंगरातून वाहत येणार्‍या निर्झरासारखी आहे. ती कधी खळाळत खाली येते, तर कधी कुठल्याशा दगडावर आपटून पुन्हा प्रवाही होते. त्यांच्या कवितेतील कारुण्यभाव, वीररस, द्रष्टेपण दिसते. अशा या आधुनिक कालिदासाला आदरपूर्वक नमन!
 
 - सुमेध  बागाईतकर 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121