मुंबई : भारतीय लष्कराचे दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन आणि भारतीय नौदलाचे पश्चिमी कमांडचे फ्लॅग ऑफिसर व्हाइस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी बुधवार, दि. २४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या सीएमओ महाराष्ट्र (@CMOMaharashtra) या ट्वीटर पेजवर पोस्ट केली. मात्र अजेंद्र बहादूर सिंग यांच्या नावात केलेली चूक लक्षात येताच मुख्यमंत्री कार्यालयाने ती पोस्ट डिलिट केल्याचे समोर आले आहे.
'मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तटरक्षक दलाचे महाउपनिरीक्षक अनुराग कौशिक यांनी सदिच्छा भेट घेतली.', असे लिहीत मुख्यमंत्री कार्यालयाने अजेंद्र बहादूर सिंग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावेळी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ती पोस्ट रिट्वीट करत मुख्यमंत्री कार्यालयाची चूक निदर्शनास आणून दिली. "हा फोटो नौसेनेचे पश्चिमी कमांडचे फ्लॅग ऑफिसर व्हाइस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांच्या सोबतचा आहे. तुमच्या सत्तेतील बेबनाव महाराष्ट्र रोज अनुभवतो आहे. निदान भेटीचा फोटो तरी योग्य व्यक्तीसोबत असावा, इतकी माफक अपेक्षाही नसावी का? अंधेरी नगरी, चौपट राजा!", असे लिहीत सचिन कल्याणशेट्टींनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
आपण घातलेला घोळ निदर्शनास येताच आधीची पोस्ट डिलिट करत नवीन सुधारित पोस्ट ट्वीट करणे मुख्यमंत्री कार्यालयास भाग पडल्याचे गुरुवारी (दि. २६ मे) केलेल्या ट्वीटमधून दिसून आले.