
मुंबई : राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजेंचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला असल्याचे ठाम मत संजय राऊत यांनी मांडले आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी हवी असल्यास संभाजीराजेंनी पक्षात प्रवेश करावा अशी भूमिका शिवसेनकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजेंनी हि अट मान्य न केल्यामुळे शिवसेनेकडून कोल्हापूरमधीलच दुसऱ्या नेत्याला उमेदवारी देण्याचं ठरलं होत. त्यानुसार संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले होते.
मात्र संभाजीराजेंविषयी बोलताना आमच्याकडून संभाजीराजेंचा विषय संपला आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच "मराठा संघटना संजय राऊत आणि शिवसेनेला हे महागात पडेल अशा धमक्या देत आहे. परंतु संजय राऊतांचा या गोष्टींशी व्यक्तिगत संबंध काय? शिवसेनेचा तरी काय संबंध? जे अशा धमक्या देत आहेत, त्यांनी मागच्या काही दिवसांतल्या घडामोडींचा अभ्यास करावा," असेही राऊतांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर "संभाजीराजेंचा सन्मान म्हणूनच आम्ही त्यांना शिवसेनेच्या कोट्यातली जागा द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना काय करू शकते? ४२ मतं आम्ही त्यांना द्यायला तयार होतो. आमची अट नाही पण भूमिका एवढीच आहे की तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा. राजकीय पक्षात छत्रपती घराण्यातील कोणी जात नाही हा समर्थकांचा दावा अयोग्य आहे. संभाजीराजेंना पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. राजघराण्यातले अनेक जण विविध राजकीय पक्षांमध्ये आले असून त्या पक्षांकडून लढलेदेखील आहेत. सिनियर शाहू महाराजही शिवसेनेत आले होते," असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.