आम्ही घेतलेल्या निर्णयात ढवळाढवळ करू नका!

किशोरी पेडणेकर यांचा महापालिका आयुक्तांना सल्ला वजा इशारा

    24-May-2022
Total Views | 187
 
 

pednekar 
 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेचे आयुक्त आणि विद्यमान प्रशासक इकबालसिंह चहल यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे ‘शिवसेना नेते विरुद्ध महापालिका आयुक्त’ हा सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दि. ७ मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने सध्या पालिकेचा कारभार आयुक्त असलेल्या प्रशासकांकडे सोपविण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांच्यावतीनेघेण्यात येणार्‍या निर्णयांवर आपली नाराजी व्यक्त करणारे माजी महापौरांचे पत्र सध्या चर्चेचा विषय बनला असून, या पत्राद्वारे पेडणेकरांनी प्रशासक असलेल्या आयुक्तांना एकप्रकारे सल्ला वजा इशारा दिला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
प्रशासकांना लिहिलेल्या पत्रात किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “दि. ७ मार्च रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाल संपुष्टात आला असून,महापालिकेच्या अधिनियमानुसार,आपली प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, २०१७ ते २०२२ या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या मुंबई महापालिका आणि स्थायी समितीसह विविध समित्यांकडून घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये आपण फेरफार करत असल्याचे समोर येत आहे. तरी, महानगरपालिका तसेच, स्थायी समितीसह विविध समित्यांनी महानगरपालिकेच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही फेरफार अथवा सदर प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे निर्णय महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी घेणे उचित ठरणार नाही,” असे म्हणत एकप्रकारे किशोरी पेडणेकर यांनी आयुक्तांना आपण घेतलेल्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला आहे.
 
 
सत्ताधारी विरुद्ध आयुक्त वादाचा नवा अंक
 
 
‘महापालिका आयुक्त विरुद्ध सत्ताधारी शिवसेनेतील नेतेमंडळी’ हा वाद आता नवा राहिलेला नाही. यापूर्वी अनेकदा आयुक्त आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या धोरणावर आणि कार्यशैलीवर टीका टिप्पणी करत तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने आपली नाराजी उघडपणे जाहीर केलेली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये तर प्रशासकीय अधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या वर्तनाच्या विरोधात स्वतः तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर या स्वतःच्याच दालनाबाहेर ठिय्या मारून बसलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. त्यातच सोमवारी पेडणेकरांनी लिहिलेल्या पत्रामुळे हा वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे.
 
 
 
‘ती’ फक्त सूचना, आयुक्तांवर नाराजी नाहीच!
 
  
महापालिका आयुक्त असलेल्या प्रशासकांना लिहिलेले पत्र हे केवळ कनिष्ठ दर्जाचे अधिकारी कशाप्रकारे काम करत आहेत, याची माहिती देणारे होते. त्यात आयुक्तांच्या विरोधात कुठलीही टिप्पणी करण्यात आलेली नाही. आयुक्त आपले काम व्यवस्थितरित्या बजावत असून, माझा त्यांच्या कामावर कसलाही आक्षेप नाही. लोकनियुक्त प्रतिनिधींच्या सभागृहाने संमत केलेले निर्णय, जर काही अधिकारी परस्पर बदलत असतील, तर ते अत्यंत अयोग्य आहे. या हालचालींची सूचना आयुक्तांना पत्राद्वारे देण्यात आली आहे. माझी महापालिका आयुक्तांवर कुठल्याही प्रकारची नाराजी नाही.
 
 
- किशोरी पेडणेकर, माजी महापौर, मुंबई महापालिका
 
 
 
वसुलीच्या वादामुळे सेनेकडून पत्राचे नाटक
 
 
मुंबई महापालिकेच्या ५७० कोटींचे ट्रेंचिंगचे कंत्राट, राणीच्या बागेतील २९० कोटींचे कंत्राट, ‘टनेल लॉण्ड्री’चे १६० कोटींचे कंत्राट आणि महापालिकेच्या जाहिरातीसाठीचे पाच कोटींचे कंत्राट या चार कंत्राटांमधील आपला हिस्सा जो वसुलीच्या माध्यमातून मिळतो, तो न मिळाल्यानेच माजी महापौरांकडून अशाप्रकारचे पत्र लिहिण्याचे नाटक करण्यात आले आहे. महापालिकेत सुरु असलेल्या ‘वाझेगिरी’चे हे उत्तम उदाहरण आहे. भाजपने २४० कोटींच्या आणखी एका कंत्राटावर न्यायालयात दाद मागितली असून ते प्रकरणदेखील आता निर्णयाने वळणावर येऊन ठेपले आहे आणि त्याचाही निकाल काही दिवसांत लागणार आहे. केवळ वसुलीच्या वादातूनच किशोरी पेडणेकरांनी हे पत्र लिहिले आहे.
 
 
- विनोद मिश्रा, पक्षनेते तथा माजी नगरसेवक, भाजप
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा दि. १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. तीन दिवसांनंतर डीएनए चाचणीमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११.१० वाजता दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे दिले. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121