ठाणे (प्रतिनिधी): ‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट ज्यांच्या जीवनावर साकारला आहे, त्या शिवसेनेच्या दिवंगत आनंद दिघे यांनी ठाण्यातील बार संस्कृतीविरोधात शड्डू ठोकून कशाप्रकारे सेनेच्या रणरागिणी या शेट्टी कंपनीचे कंबरडे मोडतात, याचे वास्तव चित्रण ‘धर्मवीर’ चित्रपटात दाखवले आहे. असे असताना धर्मवीरांचा हा आदर्श ठाण्यातील शिवसेना नगरसेविकेच्या पतीने कसा पायदळी तुडवला, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ‘व्हायरल’झाला आहे. यासंदर्भात संबंधित नगरसेविकेशी संवाद साधला असता त्यांनी, “पतीने हे विरंगुळा म्हणून केले, यात वावगे काय?” असा प्रतिसवाल करून राजकीय असुयेतून कुणीतरी नाहक बदनामी करीत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या ‘व्हायरल’व्हिडिओमुळे ठाण्यात डान्सबार संस्कृती फोफावल्याचे समोर आल्याने पोलीस आता याविरोधात काय कारवाई करतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात हुक्का पार्लर आणि डान्सबार खुलेआम सुरू असल्याबाबत अनेक तक्रारी आणि निवेदने आ. संजय केळकर यांनी पोलीस तसेच राज्याच्या गृहमंत्रालयाकडे केल्या आहेत. तरीही पोलिसांनी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. याउलट असे काही ठाण्यात घडतच नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असताना सत्ताधारी शिवसेना नगरसेविकेचा पतीच एका डान्सबारमध्ये रंग उधळत असल्याचे चित्रण ‘व्हायरल’झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे पोलिसांचा दावा फोल ठरत असताना शिवसेनेचे पितळही उघडे पडले आहे.
सेनेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार
सेनेच्या एका रणरागिणीचा पती मित्रमंडळीच्या गराड्यात बारमध्ये अय्याशी करीत असल्याने सेनेला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे धर्मवीर आनंद दिघे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिक कार्यरत असल्याचा दावाही यामुळे खोटा ठरला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात या बार संस्कृतीविरोधात उभे ठाकून सेनेच्या रणरागिणी आणि शिवसैनिकांनी बारवाल्यांना धडा शिकवल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, शिवसैनिकांनीच धर्मवीरांचा आदर्श पायदळी तुडविल्याची जोरदार चर्चा ठाण्यात रंगली आहे.