
पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरातील मशिदींवरील अनाधिकृत भोंगे हटवावे, यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. हे भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून पुणे पोलिसांना चार दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. ’चार दिवसात मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, अन्यथा दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार,’ असा इशारा या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलिस स्टेशनला हेमंत संभूस यांनी हे पत्र दिले आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडली. या सभेच्या माध्यमातून भाजपने उचलून धरलेल्या मशिदींवरील भोंग्यांच्या विषयात मनसेनी उडी घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, ‘मशिदींवरील भोंगे काढा, अन्यथा मशिदींसमोर लाऊड स्पिकरवर मनसे कडून हनुमान चालिसा लावली जाईल’, असा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर पुण्यात मनसे आक्रमक झाली असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसेने समाजात तेढ निर्माण करू नये असे आवाहन कले होते. शिवाय ‘समाजामध्ये तेढ निर्माण करणार्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल’ असा इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला होता.
गृहमंत्र्यांना मनसेचे प्रत्युत्तर
गृहमंत्र्यांनी दिलेल्या इशार्याला मनसेचे चिटणीस संदिप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘गृहमंत्र्यांनी आम्हाला दम देण्यापेक्षा कायद्याचं पालन करावं. सन्माननिय उच्च न्यायालयाने काय भूमिका घेतलीय की, भोंगे उतरले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला दम देणार, आमच्यावर कारवाई करणार. कारवाईला कोण महाराष्ट्र सैनिक घाबरत नाही. आम्हाला काय फरक पडत नाही त्या कारवाईचा. मूळात विषय असाय की आम्ही सांगतोय कायद्याचं पालन करायचा. ते पहिलं गृहमंत्र्यांनी करावं आणि मग आम्हाला दम द्यावा,’ असं म्हणत संदिप देशपांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.