मुंबई : "मुंबई महापालिकेत आदित्यसेना भ्रष्टाचार करण्याची सध्या एकही संधी गमावत नाहीये. काहीकरून त्यांच्या मर्जीतील ठेकेदार व कंपन्यांनाच कंत्राट मिळालं पाहिजे असा प्रस्ताव प्रशासनाला दाबावात आणून केला जात आहे. इतर कंपन्या सहभागी होऊ शकतात परंतु त्या पात्र ठरू शकत नाही. अशाप्रकारे हा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.", असे म्हणत भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
"एकीकडे केंद्र सरकारचे २३४ कोटी खात्यात जमा झाले असतानाही नेहमीप्रमाणे केंद्र सरकार पैसा देत नाही म्हणून बोंब मारली जाते. दुसरीकडे टक्केवारीसाठी लगबगीने सोयीस्कर निविदा काढल्या जातात. केंद्र सरकारच्या निधीवर टक्केवारीसाठी डल्ला मारू देणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी सिव्हीसी आणि कॅग यांच्याकडे आम्ही रितसर तक्रार दाखल करणार आहोत.", असेही ते पुढे म्हणाले.
युरोपियन युनियनसह जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषीत केलेल्या आणि पनामा पेपर्समध्ये नाव आलेल्या कंपनीला १४०० ईलेक्ट्रीक बसेस खरेदी कंत्राट मिळावे यासाठी नवा डाव आखण्यात आला असल्याचे आ. आशिष शेलार यानी विधानसभेत सांगितले होते. याबसचे पहिले टेंडर हे केवळ २०० बससाठी काढण्यात आले होते. त्यानंतर बसची संख्या वाढवून ती ९०० करण्यात आली. पुन्हा यामध्ये वाढ करुन ही संख्या १४०० करण्यात आली होती. मुंबईतील रस्त्यावर चाचणी झाली नसतानाही एवढया बस घेण्याचा निर्णय किती योग्य; याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे यांनी उत्तर देणे टाळले होते.