मुंबई : “जी माणसे जीवनध्येयाने झपाटलेली असतात, तीच इतिहास घडवतात,” असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी प्रशंसोद्गार भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले. ’शिवऋषी आणि शिवसृष्टी’ या विशेषांकाचे प्रकाशन चित्रा वाघ यांच्या हस्ते वसई येथे गुरुवारी झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक, उद्योजक चंद्रशेखर धुरी, भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रज्ञा कुलकर्णी, भाजपचे प्रतिनिधी विलास मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या छोटेखानी भाषणात चित्रा वाघ यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या व्यक्तित्वाचा व त्यांच्या अमूल्य योगदानाचा वेध घेतला. राजन नाईक यांनी आपल्या भाषणात ‘विवेक’ समूहाच्या एकूण कार्याची दखल घेत त्याचे प्रसारमाध्यमातील वेगळेपण अधोरेखित केले.
सा.‘विवेक’च्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चंद्रशेखर धुरी यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. आम्रपाली साळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वसईतील विविध संघटनाच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी कृष्णात कदम, दयानंद शिवशिवकर, राजेश पोदार, दीपक पाडावे यांनी विशेष मेहनत घेतली.