मुंबई : “घराणेशाही ही राजकारणाला लागलेली कीड असून, यामुळे पक्षातील कार्यकर्त्यार्ंचा विकास आणि संघटनेची प्रगती खुंटत जाते. एखाद्याच्या कर्तृत्वासमोर अडथळे आणि आव्हान निर्माण करण्याचे काम हे घराणेशाही करत असते,” असे मत प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे गुरुवार, दि. २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’गुरुवार सभा’ या बौद्धिक मंथन उपक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ’राजकारणातील घराणेशाहीच्या मर्यादा’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे महासंचालक रवींद्र साठे, माध्यम जनसंपर्क व कार्यक्रम अधिकारी यदुनाथ देशपांडे, कार्यक्रम सहअधिकारी गंधार भांडारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
केशव उपाध्ये म्हणाले की, “१९५९ रोजी काँग्रेस पक्षात अनेक सक्षम मंडळी असूनही नेहरूंनंतर इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान झाल्या आणि तिथूनच घराणेशाहीला सुरुवात झाली. त्यामुळे, काँग्रेस पक्षात होऊ लागलेल्या घुसमटीमुळे सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांकडून अनेक प्रदेशील पक्ष जन्माला आले. विशेष म्हणजे या पक्षांनीसुद्धा नंतरच्या काळात तीच भूमिका घेतली. काँग्रेसच्या एकाधिकार शाहीला विरोध करणारे हे राजकीय पक्ष, हळूहळू व्यक्तीकेंद्रित होऊ लागले आणि यातूनच घराणेशाही वाढू लागली. त्यामुळे आज लोकशाहीला अशी घराणेशाही घातक असून त्याच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. अन्यथा, घरणेशाहीशी असलेला संघर्ष पुढच्या काळातही सुरू ठेवावा लागेल.”
यावेळी केशव उपाध्ये यांनी राष्ट्रस्तरावर आणि राज्यस्तरावत असलेल्या अनेक घराणेशाही पक्षांचा, नेत्यांचा उल्लेख केला. यात विशेषतः बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, मुलायम सिंह यादव, लालूप्रसाद यादव, फारूक अब्दुल्ला, अशा अनेक नेत्यांची नावे प्रकर्षाने दिसून आली.