संस्कृती संग्राहक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2022   
Total Views |

sagar
आजोबांकडून मूर्ती संग्रहाचा वारसा मिळालेल्या आणि आपल्या संस्कृतीची, परंपरांची ओळख डोळसपणे करून देणार्‍या नाशिक येथील सागर काबरे यांच्याविषयी...
 
  
संस्कृतीचा प्रवाह अखंड अविरतपणे वाहताना दिसतो तेव्हा तिथे संस्कृती जबाबदारीने पुढे नेणारी काही माणसं दिसून येतात. यातील एक नाव म्हणजे नाशिकमधील आर्किटेक्ट सागर काबरे. आपला व्यवसाय वास्तुविशारदाचा असला, तरी छंद मानवी जीवनासाठी अतिशय आवश्यक असतात. ते मानवाला जगण्याचं प्रयोजन देतात, असे ठामपणे मानणार्‍या सागर यांच्याकडे धातूच्या मूर्ती, विविध जुने कॅमेरे व जुन्या वळणाची भांडी यांचा मोठा संग्रह आहे. नाशिक शहरातील अनेक नव्या-जुन्या नामांकित व सुप्रसिद्ध वास्तू त्यांच्या कुटुंबातील वास्तुविशारदांनी साकारलेल्या आहेत, हे सागर अतिशय कौतुकाने सांगतात. त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच कलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. सागर यांच्या आजोळी त्यांच्या आजोबांनी धातूंच्या जवळपास सर्व देवांच्या अनेक मूर्ती अतिशय आवडीने संकलित केल्या आणि जतन केल्या होत्या.
 
आजोबांकडचा संग्रह पाहता परिचयातील अनेक जण आपल्याकडच्या मूर्तीदेखील आणून देत. लहानपणापासूनच आजोबांचा हा विलक्षण संग्रह पाहत काबरे मोठे झाले. आपल्यानंतर हा वारसा कोणाकडे सुपूर्द करायचा, याचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या आजोबांनी संपूर्ण संग्रह सागर यांच्या हाती अतिशय विश्वासाने सोपवला. आज सागर व त्यांचे कुटुंब आत्मियतेने हा संग्रह केवळ जोपासतच नाहीत, तर त्यात वेळोवेळी भर घालत आहेत. या मूर्तींचे सागर यांनी त्यांच्या घरातच एक छोटेखानी संग्रहालय उभारले आहे. त्यांच्याकडे धातूच्या जवळपास अडीच हजार मूर्ती आहेत, दुर्मीळ असे अनेक कॅमेरे आहेत, तर नानाविध घाट व आकाराची अतिशय सुरेख अशी भांडीदेखील त्यांनी जमवलेली आहेत. अर्धा इंचापासून जवळपास तीन ते चार फुटांपर्यंत आकार असलेल्या या मूर्तींमध्ये गणेशमूर्ती विशेषत्वाने आहेत. नवग्रहाची मूर्ती, लक्ष्मी, गरुड, कुबेर, विंचू आदींच्या मूर्तीदेखील आहे. संग्रहातील जवळपास ९९ टक्के मूर्ती पितळी आहेत. “माझ्याकडे येणार्‍या रसिकांना मी हा संग्रह दाखवतो, त्यातल्या मूर्तींचे वैशिष्ट्य समजावून सांगतो तेव्हा संस्कृतीच्या वहनातील आपण एक दुवा आहे, असे मला वाटते. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राण्याला, पक्ष्याला महत्त्व आहे आणि तेच या सगळ्या मूर्तींमधून सातत्याने निदर्शनास येते. यांच्या सहवासात आपण आपल्या अस्तित्वाच्या अधिक जवळ येतो. आजोबांनी हा खजिना माझ्याकडे दिला, यासाठी मी स्वतःला कायम नशीबवान मानतो. प्रत्येक मूर्ती घडवणार्‍या अनामिक मूर्तिकाराशी मी नकळतपणे जोडला जातो,” असे सागर त्यांच्या संग्रहाविषयी सांगतात. या मूर्तींबरोबर असताना काळाचा एक मोठा पट आपल्याशी संवाद साधतो, असे त्यांना वाटते.
 
 
असेच काहीसे आपुलकीने ते आपल्याकडील कॅमेरा संग्रहाबद्दलदेखील बोलतात. आजच्या बदललेल्या ‘डिजिटल’ युगात एका क्षणात हजारो फोटो काढता आले, तरी एक फोटो मिळण्यासाठी १५ दिवस वाट पाहावी लागत होती, त्या काळाबद्दल, बदलणार्‍या तंत्रज्ञानाबद्दल व काळ मागे गेला तरी विस्मरणात जाऊ नये, याबद्दल ते बोलतात. मूर्ती आजोबांकडून आलेल्या असल्या, तरी विविध आकारांची भांडी संग्रहात असावी, हा मात्र खुद्द सागर यांचा प्रयत्न. आपल्याकडची जुन्या घाटाची, जुन्या आकारांची अनेक भांडी सहसा मोडीत देण्याकडे व नवी भांडी वापरात येण्याकडे आजकाल साधारणतः कल दिसून येतो. सागर मात्र ही मोडीत निघणारी भांडी आपल्याकडे घेऊन येतात. या भांड्यांना केवळ वस्तू म्हणून टाकून देणे त्यांच्या मनाला पटत नाही. यांनी एक संपूर्ण काळ पाहिलेला असतो, प्रत्येकाला स्वतःचा असा इतिहास असतो, तो आपण कसा मोडीत काढणार, हा प्रश्न त्यांना पडतो. साधी एक कळशी पाहिली तर तिचा आत्ताचा आकार येण्यासाठी किती काळ गेला असावा, त्या मागे ती कळशी उचलणार्‍या स्त्रीला त्रास होऊ नये, म्हणून किती विचार झालेला असावा, याविषयी सागर बोलतात तेव्हा त्यांच्यातील स्थापत्य कलाकाराच्या सोबतीने असलेल्या संवेदनशील मनाचेही दर्शन होते.
 
 
अर्थात, हा संग्रह सांभाळणे सोपे नाही. धातूच्या वस्तूंची निगा राखावी लागते. त्यांची साफसफाई, ऋतुबदलाचे त्यांच्यावर होणारे परिणाम याची काळजी घ्यावी लागते. सागर व संपूर्ण काबरे कुटुंब हे निगुतीने व आवडीने करतात. पुढच्या पिढीतील त्यांची दोन्ही मुलेदेखील हा वारसा तत्परतेने सांभाळतात, याचा सागर यांना विशेष आनंद आहे. यानिमित्ताने आपल्या सांस्कृतिक वारशाची मुलांना जाणीव होते आहे व प्रत्येक मूर्तीची वैशिष्ट्ये, त्यामागील कथा जाणून घेण्यात त्यांना रस वाटतो, हेदेखील सागर आवर्जून सांगतात. हा मूर्तिसंग्रह पाहण्यासाठी त्यांच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती आनंद घेऊनच बाहेर जाते. जुने कॅमेरे, जुन्या वळणाची भांडी पाहताना येणार्‍या व्यक्ती आठवणींमध्ये रमून जातात. समाजमाध्यमांवर विविध सणानिमित्त सागर काबरे आपल्या संग्रहातील लक्षणीय मूर्तींच्या फोटोंसह शुभेच्छा देतात. पुढील पिढीला आपल्या संस्कृतीची, परंपरांची ओळख डोळसपणे व जाणीवपूर्वक करून देण्याची आपली मानसिकता असावी, असे त्यांना वाटते. त्यादृष्टीने प्रयत्न करणारे सागर व्यवसाय, परंपरा जतन, छंद सार्‍याच आघाड्यांवर यशस्वी होऊन एक उदाहरण ठरताना दिसतात.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@