मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये, विभागांमधील विविध पदांवरील अधिकारी निवृत्त झाले असतानाच, या वर्षाच्या अखेरपर्यंत ११३ महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकार्यांचीही पदे रिक्त होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून असंख्य अधिकार्यांची रिक्त पदे अद्याप भरली नसतानाच, १०० हून अधिकार्यांचा गेल्या काही दिवसांत आणि येत्या महिन्यांत निरोप समारंभ झाला आणि होणार आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहिती अधिकाराच्या अहवालानुसार, शहरातील नागरी समस्यांशी संबंधित विविध पदे/काम हाताळणार्या मुंबई महापालिकेत गेल्या चार वर्षांमध्ये एकूण पदांपैकी चार हजारांहून अधिक अभियंत्यांची पदे रिक्त असल्याची माहिती शहर अभियंता कार्यालयातील सूत्रांनी दिली. यामध्ये कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, साहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपप्रमुख यांच्या रिक्त पदांचाही समावेश आहे. उपमुख्य, कार्यकारी, साहाय्यक अभियंत्यांची सर्वाधिक रिक्त पदे आहेत. या तीन श्रेणींतील अभियंता वयोमानानुसार, निवृत्त होत असल्यामुळे ही संख्या वाढतच जाणार असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
ज्या पदांची किमान वेतनश्रेणी ही कार्यकारी अभियंता या पदाच्या वेचनश्रेणीच्या तत्सम किंवा अधिक आहे, अशी पदे रिक्त होणार आहेत. दि. १ जानेवारी ते दि. १ डिसेंबरपर्यंत ही पदे रिक्त होतील. दि. १ जानेवारी ते दि. १ एप्रिलपर्यंत महत्त्वाची ३३ पदे रिक्त झाली असून, १ जानेवारी रोजी दहा, १ फेब्रुवारी रोजी दहा, १ एप्रिलपर्यंत १३ पदे रिक्त झाली आहेत. एप्रिलअखेर आठ पदे रिक्त होणार आहेत.
पाणीपुरवठा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, दक्षता या महत्त्वाच्या खात्यांचे प्रमुख अभियंता निवृत्त झाल्यामुळे या खात्यांचा कार्यभार शकट अन्य अधिकार्यांकडे सोपवण्यात आला आहे. पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, वरिष्ठ/वैद्यकीय अधिकारी, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, उपायुक्त, कार्यकारी अभियंता आदी पदे रिक्त झाली. ही पदे त्वरित न भरल्यास ती काही काळ रिक्त राहतील किंवा संबंधित अधिकार्यांना दोन पदभार सांभाळावे लागणार आहेत. यामुळे अशा अधिकार्यांवर कामाचा बोजा लादला जाण्याची दाट शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले आहे.
रिक्त पदे भरण्याचा अहवाल महापालिकेला स्वतंत्ररित्या कळवणार
जानेवारीपासून अनेक अधिकारी निवृत्त झाले असले तरी, त्यांच्या रिक्त पदांवर अधिकार्यांची नियुक्ती त्वरित करणे आवश्यक असूनही रिक्त पदे भरण्याचा अहवाल महापालिकेच्या माहितीसाठी यथावकाश स्वतंत्ररित्या कळवला जाईल, असे सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुख कर्मचारी अधिकार्यांनी म्हटले आहे.