मुंबई (प्रतिनिधी): भारतातील पुरातन संस्कृती आणि त्यातील कौशल्यांविषयी बोलताना “गंजविरोधी लोखंडाचा शोध भारतात दोन हजार वर्षांपूर्वीच लागला आहे,” असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देशाच्या प्रत्येक भागातील ’स्वदेशी’ आणि ’व्होकल फॉर लोकल’च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव आणि कला आणि कौशल्य यांच्या प्रदर्शनाची संधी देणार्या ‘हुनर हाट’ची 40वी आवृत्ती 16 एप्रिल ते 27 एप्रिलदरम्यान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात सुरु आहे.
या ’हुनर हाट’चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव एस. पी. सिंह टेवटिया आदी मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हडप्पा, मोहेंजोेदडो, राखीगडी, विराना अशा आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीचे अवशेष सापडतात. त्या ठिकाणच्या त्या संस्कृतींची ओळख तेथील कारागिरांनी त्यावेळी जे शिल्प तयार केले त्यावरून होते. भारतात मातीचे, लोखंडाचे आणि विविध धातुंचे शिल्प आपल्याला सापडतात. सध्या आपल्याला अनेकदा गंजविरोधी लोखंडाची जाहिरात पाहायला मिळते. मात्र, भारतातील कारागिरांनी दोन हजार वर्षांपूर्वीच गंजविरोधी लोखंड तयार केले. ते आपण आजही पाहतो.”
पंतप्रधानांमुळे कौशल्याला बाजारपेठेशी जोडण्याचे काम
ते पुढे म्हणाले की, “मला वाटते भारताचे हे कौशल्य आपल्या शहरीकरणामुळे, नागरीकरणामुळे हळूहळू लुप्त होत होते. छोट्या छोट्या समूहांपर्यंत ही कौशल्य मर्यादित झाली होती. तसेच, बाजारपेठ उपलब्ध नसल्याने संपत होती. या कौशल्याला बाजारपेठेशी जोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. आज त्याचा परिणाम असा झाला की, नऊ लाखांपेक्षा अधिक लोकांना केवळ रोजगारच नाही, तर इतका फायदा मिळाला की, त्यांचे कौशल्य ते वाढवू शकले.”