जितेंद्र आव्हाड म्हणजे फणा काढलेला साप! भर सभेत केली नक्कल
12-Apr-2022
Total Views | 177
86
ठाणे : जितेंद्र आव्हाड एखाद्या सापासारखा फणा काढून बोलतील, काय तर म्हणे मदरशात जर एखादा वस्तरा जरी सापडला तरी मी राजकारणातून निवृत्त होईल. कसे सापडतील?, दाढी करतात कुठे?, असा सवाल त्यांनी आव्हाडांना केला. मुंब्र्यातील गुन्हेगारांच्या बातम्यांबद्दलचा पाढा ठाकरे यांनी वाचून दाखवला. तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्यांचा राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. "आता आव्हाड बोलतील की, साप डसेल म्हणून, ये बघ कसा गरगर फिरवून भिरकावतो की नाही बघ", असं म्हणत त्यांनी आव्हाडांचा समाचार घेतला.
कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना, कधी पवार तर कधी ठाकरे, अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांची तुलना लवंडे म्हणत केली आहे. काही लोक हे कुणाचेच नसतात, इथून पडलं तर तिथले तिथून पडलं झुका तर तिकडे झुका, अशा लोकांना लवंडे म्हणतात, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राऊतांना लगावला.
राज ठाकरे म्हणाले, "आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी एक चांगला शब्द सुचवला होता. काही लोक हे लवंडे असतात... ल वर अनुस्वार आहे. आता लवंडे म्हणजे काय, तर आपल्याला पूर्वी पत्रावळीसोबत द्रोण देतात. त्यात जिथून वाढतात तिथं ते द्रोण कलंडतंयं. तसे हे. कुणाचे आहेत तेच कळत नाही, असे म्हणत राज यांनी राऊतांचा समाचार घेतला. राऊतांच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली. आता अंगाशी आल्यानंतर भर पत्रकार परिषदेत शिव्या देत सुटले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला उत्तर देत प्रतिक्रीया देणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. ठाण्यातील भाषणाची सुरुवात राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाने घेतली. "सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, एक नोटीस काय आली, लगेच राज ठाकरेंची भूमिका बदलली. मला त्यांना विचारायंचं, अजित पवारांच्या घरी धाड पडते. तुमच्या घरी का पडली नाही?", असा प्रश्न त्यांनी विचारला.
"पवार मोदींना भेटून आले की धाडी पडतात. सुरुवातीला अनिल देशमुखांवर पडली. त्यानंतर पवार मोदींना भेटून आले बघा जरा नवाब मलिक लुडबूड करतायंतं, मग नवाब मलिक आत गेले. त्यानंतर सगळ्या खासदारांना एकत्र बोलवून घेतलं. त्यानंतर राऊतांवर कारवाई झाली, असं म्हणतात.", असा टोला त्यांनी पवारांना लावला. अजित पवारांच्या बहिणींच्या घरी धाडी पडतात, सुप्रिया सुळेंच्या का नाही, असा उपरोधिक सवाल त्यांनी विचारला. मोदी-पवारांचे संबंध सुमधूर असतात. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, असाही टोला त्यांनी लगावला.