मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात सोमवारी (दि. १४ मार्च) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. यामुळे त्यांची रवानगी तुरुंगातच होणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी २ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.
"प्रथमदर्शी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून आरोपी अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सामील असल्याचे सिद्ध होत आहे. तसेच साक्षीदारांच्या विधानांमध्ये विरोधाभास असताना, अशा वेळी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा विचार केला जाऊ शकत नाही.", असे न्यायाधीश आर. एस. रोकडे यांच्याकडून नोंदविण्यात आले आहे.