पापं तरंगू लागली...

    05-Feb-2022
Total Views | 527

Maharashtra 
 
 
 
आपली दुष्कृत्ये लपविण्यासाठी पापांचे गाठोडे करुन कितीही खोल तलावाच्या तळाला फेकले तरी कधी ना कधी ते वर तरंगतेच! सध्या अ‍ॅन्टिलिया स्फोटक प्रकरण आणि पोलिसांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारच्या पापांचे गाठोडेही असेच तरंगू लागले असून आता त्याच्या वजनाने नेमके कोण बुडते, तेच पाहायचे.
 
 
महाराष्ट्राच्या जनमताला पायदळी तुडवून सत्ता बळकावणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा पायाच मुळी असत्य आणि दुराचाराने बरबटलेला! दगाबाजीच्या अशा या अगदी पहिल्या दिवसापासून लागलेल्या किडीने ठाकरे सरकारला मात्र आता पुरते पोखरले आहे. वाझे-परमवीर-देशमुख यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे नावही समोर आल्याने या प्रकरणाची धग अधिकच वाढलेली दिसते.
 
खरंतर या तिघाडी सरकारमध्ये अगदी प्रारंभीपासून काहीही आलबेल नव्हतेच. मैत्रीचे, मानाचे खोटे वायदे झाले, किमान समान कार्यक्रमाच्या आणाभाकाही घेतल्या गेल्या आणि हे सगळे केवळ आणि केवळ सत्तास्वार्थासाठीच! पण, मनात एक आणि ओठावर दुसरे याच नीतीने या तिन्ही पक्षांची लटपटती वाटचाल आजतागायत कायम दिसते. मग सरकारचे एकांगी निर्णय असो, विविध खात्यांच्या निधीमधील भेदभाव असो वा मंत्र्यांची परस्परविरोधी वक्तव्ये, या सरकारमधील विसंवाद आणि निष्क्रियतेचा फटका महाराष्ट्राला, येथील नागरिकांना वेळोवेळी सहन करावा लागला. परीक्षांमधील गोंधळ, भ्रष्टाचारापासून ते ‘एसटी’च्या संपापर्यंत सर्वच बाबतीत दिशाहीन ठाकरे सरकार सर्वस्वी कुचकामीच ठरले. सरकारमध्ये तिन्ही पक्ष नावाला एकत्र असले तरी स्वपक्षाचे हित साधण्यासाठी कुरघोडीच्या राजकारणाने मागील दोन वर्षांत अक्षरश: कळस गाठला. कार्यकर्ते, नगरसेवक पळविण्यापासून ते मंत्रालयातील ‘पॉवरगेम’पर्यंत तिन्ही पक्षांनी राजकारणाच्या सारीपाटालाही लाजवेल, अशा चाली खेळल्या. त्यामुळे नेमकं या तिघाडीमध्ये कोण कोणाला पडद्याआड संपविण्याचा प्रयत्न करतंय, याचा विचार करुन सामान्य माणसाच्या मेंदूला मुंग्या याव्या, अशी परिस्थिती! अ‍ॅन्टिलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझेची अटक, पुढे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंहांचा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसुलीचा ‘लेटरबॉम्ब’, अशा राज्याच्या राजकारणालाही मुळापासून हादरवून सोडणाऱ्या या घटनांमुळे विश्वासघातकी ठाकरे सरकार जनतेमधील आपली उरलीसुरली विश्वासार्हताही गमावूनच बसले. वाझे-परमवीर-देशमुख या प्रकरणातील आजवरच्या एकूणच घटनाक्रमावर नजर टाकली असता, हे प्रकरण व्यक्तिकेंद्रीत नसून त्याला पक्षीय राजकारणाचीही किनार अगदी स्पष्ट दिसते.
 
 
सचिन वाझेवर झालेल्या आरोपांनंतर ‘वाझे काय लादेन आहे का?’ असा प्रतिप्रश्न विचारणारे तर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते. पण, याच वाझेचा अ‍ॅन्टिलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी कटातील सहभाग उघड झाल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांना एकाएकी दातखीळ बसली. कारण, सचिन वाझेने २००८ साली शिवसेनेत पक्षप्रवेश केला. ठाकरे सरकार सत्तेत येताच वाझे पुन्हा शासकीय सेवेत रुजूही झाला. तसेच सगळ्या महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास पोलीस अधिकारी म्हणून वाझेकडेच सोपवला गेला. एवढेच नव्हे, तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर शिवसेनेतील एका बड्या नेत्याचे वाझेशी थेट आर्थिक संबंध असल्याचाही गौप्यस्फोट केला होता. त्यामुळेच शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, अखेरीस सत्य समोर आलेच. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनीही वाझेच्या माध्यमातून देशमुखांवरील १०० कोटी वसुलीच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि पुढे ‘ईडी’च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या अनिल देशमुखांनाही पायउतार व्हावे लागले. इतके दिवस केवळ वाझे-परमवीर-देशमुख या त्रिकुटाभोवती फिरणाऱ्या या प्रकरणात आता राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांचे नावही चौकशीअंती समोर आले. तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही ‘ईडी’ चौकशीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा ठपका ठेवला. आता कुंटे यांचे ठाकरे कुटुंबीयांशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे, त्यांच्या आरोपाने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. त्यामुळे आपसुकच या प्रकरणातील ‘शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस’ हा सुप्त सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला. कुंटेंच्या या दाव्यानंतर शिवसेनेवर निशाणा साधत राज्यातील पोलीस विभागात बदल्यांसाठीच्या याद्या अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या, असा प्रतिआरोप देशमुखांनी नुकताच केला. तसेच अनिल देशमुख यांनीही गृहमंत्रिपदी असताना अनिल परबांच्या गृहखात्यातील राजकीय हस्तक्षेपाबद्दल पक्षश्रेष्ठींकडे जाहीर नाराजीही व्यक्त केली होतीच. पण ‘मातोश्री’च्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या अनिल परबांना मात्र साहजिकच अभय मिळाले.
 
 
शिवाय अनिल परब नेमके कोणाच्या सांगण्यावरुन देशमुख आणि परमवीर सिंहांना बदल्यांच्या याद्या देत होते, हा महत्त्वाचा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो. तसेच एकाच सरकारमधील माजी मंत्री दुसऱ्या आजी मंत्र्यावर असा गंभीर आरोप करण्याचाही हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून एकूणच या प्रकरणाचे धागेदोरे हे ‘मातोश्री’कडेच अंगुलीनिर्देश करतात. या प्रकरणाचा काय निकाल लागायचा तो लागेल आणि सत्यही सर्वांसमक्ष येईलच. पण, सरकारी यंत्रणांचा अशाप्रकारे राजकीय वसुलीसाठी आणि कुरघोडीसाठी होणारा गैरवापर मात्र निश्चितच लोकशाही मूल्यांना नख लावणारा आहे. त्यातच जी वसुली पूर्वी शिवसेनेच्या सत्ता असलेल्या महानगरपालिका क्षेत्रांत टेबलाखालून होत होती, तेच ‘वसुली पॅटर्न’ राज्यस्तरावरही राबविले जात असल्याच्या शंकेला या एकंदरीत प्रकरणावरुन पुष्टी मिळते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात तसे, हे सरकार अंत:विरोधाने स्वत:च कोसळेल. त्यांचे हे भाकीतच जणू सत्यात उतरवण्यासाठी ठाकरे सरकार जोमाने कामाला लागले आहे की काय, अशी आजची महाराष्ट्राच्या राजकारणाची विदारक स्थिती. कारण, वाझे ते आता अनिल परबांपर्यंत येऊन ठेपलेल्या या प्रकरणाने ‘मातोश्री’च्या अंगणात प्रवेश केला आहे. अंगणातून घराचा उंबरठा आता फार दूर नाहीच. त्यामुळे ‘भाजपबरोबर २५ वर्षं आम्ही युतीत सडलो,’ असे तावातावाने म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आणखीन किती दिवस काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा हा खोटाखोटा घरोबा टिकतो, ते येणारा काळच ठरवेल!
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121