
ठाणे : तत्कालीन एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची ठाणे (कोपरी) पोलिसानी बुधवारी तब्बल आठ तास चौकशी केली. कोपरी पोलीस ठाण्यात बारचा परवानाप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने ही चौकशी करण्यात आली. याबाबत माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अधिक भाष्य करता येणार नसल्याचे सांगितले.जे काही सांगायचे ते पोलिसाना सांगितले असुन लेखी जबाब नोंदवला.तसेच यापुढेही चौकशीत सहकार्य करणार असल्याचे वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
समीर वानखेडे यांचे नवी मुंबई येथील वाशी भागात सद्गुरु बार आणि रेस्टाॅरंट आहे. वानखेडे यांनी बारचा परवाना १९९७ मध्ये काढला होता. परंतु त्यावेळी वानखेडे यांचे वय १७ वर्ष होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर विभागाने त्यांच्याकडून खुलासा मागविला होता. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणाची सुनावणी होऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांचा बारचा परवाना रद्द करण्यात आला.
दरम्यान,याप्रकरणी शनिवारी (दि.१९ फेब्रु) उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वानखेडे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारचा परवाना मिळविण्यासाठी वानखेडे यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणाचा तपास आता कोपरी पोलिसांकडून सुरू असुन बुधवारी वानखेडे याची आठ तास चौकशी करण्यात आली.