मुंबई: मुंबईमध्ये असंख्य झोपडपट्टी आणि चाळी असून त्या ठिकाणी शौचालयांची उभारणी करणे हि पालिका आणि म्हाडाची जबाबदारी आहे. परंतु या साठी कोट्यवधींचा निधी शिल्लक असतानाही सार्वजनिक शौचालयांची कामे हि रखडलीच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेकदा सरकारी यंत्रणेकडे निधीचा अभाव असल्यामुळे कामे रखडली असल्याचे आढळून आले आहे. परंतु सार्वजनिक शौचालयांसाठीचा निधी हा पालिकेकडे असतानाही अनेक शौचालये आणि शौचकुप्यांची कामे प्रलंबित राहिली आहेत.
पालिकेने शौचालयांच्या दुरुस्तीसाठी ४४.४८ कोटींची तरतूद हि २०२१-२०२२ च्या आर्थिक वर्षात केली होती. २०१८-१९ मध्ये पालिकेने वस्ती स्वछता कार्यक्रम विभागाकडून २२,७७४ शौचकुपे बांधून घेण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. आणि त्यासाठी पुरेशा निधीची देखील सोय करण्यात आली होती. परंतु तरीही हे उद्दीष्ट मात्र पूर्ण झाले नाही. याच पार्श्वभूमीवर मे २०२२ पर्यंत १९ हजार शौचालयांची कामे पूर्ण करण्याचे पालिकेने ठरवले आहे. परंतु तरीही ३,२१८ शौचकुप्यांची कामे मात्र रखडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
साधारण दोन वर्षांपूर्वी २२,७७४ शौचकुपे बांधण्याचे उद्दीष्ट पालिकेच्या स्थायी समितीच्या आदेशानंतर दत्तक वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत ठेवण्यात आले. मात्र हे उद्दिष्ट त्या वेळेत पूर्ण करता आलेले नाही. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणाऱ्या चाळी व झोपडपट्टया, तसेच रिक्षा-टँक्सी सारख्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांसाठी सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता असते. मात्र आवश्यकता असतानाही शौचालयांची पडत आहे. त्यातूनच अनेक सार्वजनिक शौचालये मोडकळीस आल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
स्थायी समितीच्या बैठकीत काही नगरसेवकांकडून सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न मांडण्यात आला होता. यावर पालिकेच्या वस्ती स्वछता कार्यक्रम विभागाने माहिती देत म्हटले आहे कि २०२१ -२२ मध्ये संपूर्ण २४ प्रभागातील २१७ वॉर्डातील शौचालयांच्या दुरुस्तीसाठी ४४ कोटी ४८ लाख निधीची तरतूद करण्यात आली होती. यातून २७ कोटींच्या निधीतून ३२४ शौचालयांची दुरुस्ती झाली असून ७ कोटी ४७ लाख निधी बाकी आहे.