आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत अनोखा उपक्रम
ठाणे : मुंबई विद्यापीठाचे लोकमान्य टिळक संशोधन व अध्ययन केंद्र व जोशी-बेडेकर कॉलेज फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक समुह निर्मित दुर्दम्य लोकमान्य या लघुपटाचे प्रदर्शन दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या कात्यायन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ सुधीर पुराणिक, विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर, लोकमान्य टिळक अध्ययन केंद्राच्या संचालिका व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक , दैनिक मुंबई तरुण भारत प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, ज्येष्ठ दिग्दर्शक विनोद पवार, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराचे प्रमुख डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना जोशी बेडेकर कॉलेज फिल्म सोसायटीचे समन्वयक डॉ प्रशांत धर्माधिकारी म्हणाले की, 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे चरित्र म्हणजे विशाल द्रष्टेपणा व आदरणीय कर्तेपणा यांचा भव्य संगम होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित "लोकमान्य टिळक निवडक लेखसंग्रह" या साहित्य अकादमी ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा उल्लेख करत डॉ धर्माधिकारी म्हणाले की, 'लोकमान्य टिळकांचे चरित्र म्हणजे प्रत्यक्षात घडलेले महाकाव्य आहे. विद्यार्थी दशा संपल्यापासून अखेरपर्यंत सतत पंचेचाळीस वर्षे एकाच ध्येयाच्या दिशेने सर्व प्रकारे वैचारिक व संसारिक मोह टाळून सतत सन ग्रामस्थ राहणे हाच टिळकांच्या द्रष्टेपणा चा अस्सल निकष आहे'.
लोकमान्य टिळक संशोधन व अध्ययन केंद्राच्या संचालिका प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक म्हणाल्या की 'लोकमान्य टिळकांनी आपल्या गीतारहस्य या ग्रंथात सांगितलेला समत्वयोग आज पथदर्शी ठरतो. आज समाजामध्ये समन्वयाची अत्यंत गरज आहे. टिळकांनी सांगितलेल्या 'स्व'राज्यासोबत पुढच्या पिढीने 'सु'राज्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आपण आपल्या अधिकारांविषयी जागृत झालो आहोत मात्र सुराज्य हा माझा कर्तव्यसिद्ध हक्क आहे असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे वहीत लोकमान्य टिळकांना खरी आदरांजली असेल असे डॉ नाईक म्हणाल्या.
यानंतर "दुर्दम्य लोकमान्य" या लघुपटाचे दिग्दर्शक श्री विनोद पवार आपल्या मनोगतात म्हणाले की 2020 साली लोकमान्य टिळकांच्या जाण्याला शंभर वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्र लोकमान्य टिळकांना काहीसा विसरला आहे असं आम्हाला वाटलं म्हणून लघुपट निर्माण करण्याची ही वेगळी कल्पना विवेक समूहाने सुचवली. या ६७ मिनिटाच्या लघुपटाची संहिता तयार करण्यासाठी ज्येष्ठ लेखक व पत्रकार श्री अंबरीश मिश्र यांना तीन महिन्यांचा कालावधी लागला. या कालावधीत लोकमान्य टिळक समजून घेताना विलक्षण आनंद प्राप्त झाला असे ते म्हणाले.
लघुपटामागची भूमिका विशद करताना मुंबई तरुण भारतचे प्रबंध संपादक श्री दिलीप करंबेळकर यांनी लोकमान्य टिळकांच्या भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीतील योगदानाचे तीन महत्त्वाचे पैलू आपल्या भाषणात मांडले. पहिले, लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज घटकांना राष्ट्रकरणात व लोकशाही प्रक्रियेत जोडून घेण्याचं अद्वितीय काम संपन्न झालं. दुसरे, आधुनिक भारतातील सर्वाधिक लोकप्रियता प्राप्त झालेलं लोकमान्य टिळक म्हणजे पहिलं अखिल भारतीय व्यक्तिमत्त्व होय . तीसरे, भारत प्रजासत्ताक बनला पाहिजे व घटनेच्या आधारे ते प्रजासत्ताक कार्यान्वित झाले पाहिजे हा विचार त्यांनी दिला. संपूर्ण भारताला लोकशाही मूल्यांबाबत जागृत करण्याचं लोकोत्तर काम लोकमान्य टिळकांनी केलं असं श्री करंबेळकर म्हणाले.
यानंतर दुर्दम्य लोकमान्य हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. विवेक समूह निर्मित या लघुपटाची संहिता ज्येष्ठ लेखक व पत्रकार अंबरिश मिश्र यांचे आहे. श्री विनोद पवार दिग्दर्शित या लघुपटात विक्रम गोखले प्रमोद पवार व आपणास चौथे यांच्या प्रमुख भूमिका आहेत तसेच अरुणा ढेरे, सदानंद मोरे, अविनाश धर्माधिकारी, कुमार केतकर ,अरविंद गोखले, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, इत्यादी मान्यवरांनी लोकमान्य टिळकांचे विविध पैलू उलगडले आहेत. लघुपटाच्या प्रदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रश्नोत्तरांनंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ प्रशांत पुरूषोत्तम धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.
हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या यूट्यूब चैनल वर तसेच विवेक समूहाच्या फेसबुक पेजवर व मुंबई तरुण भारत च्या यूट्यूब चैनल वर थेट प्रक्षेपित करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुभाष शिंदे, डॉ प्रियंवदा टोकेकर, डॉ महेश पाटील , ग्रंथपाल नारायण बारसे, सर्व विभागांचे समन्वयक, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.