मुलुंड : महाप्रबोधन यात्रेच्या मुलुंड येथे पार पडलेल्या सभेदरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. काहीजण ‘उठ दुपारी, घे सुपारी’ अशी लोकं आहेत. शिवाय राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगला बांधायला पैसे कुठून आले ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. अशा स्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणत आहेत की, हे उद्योग माझ्या काळात गेले नाहीत. ते खोटं बोलत असल्याचे अंधारे म्हणाल्या. लाखो बेरोजगारांच्या हातचा घास हिरावून घेण्याचं काम सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना सत्तेतून दूर करण्यासाठी काही कपटी लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. पण आम्हाला उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहायचे असल्याचेही अंधारे म्हणाल्या. सध्या ED चा दुरुपयोग होत आहे. ED चा दुरुपयोग करुन इथली लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे अंधारे म्हणाल्या. या महाराष्ट्राची अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना कायम लढत राहील असेही अंधारे म्हणाल्या. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि सिंधुदुर्ग तोडून गोव्याला नेण्याचा, वेगळा विदर्भ करण्याचा घाट काही लोकांनी घातला असल्याचे अंधारे म्हणाल्या.