‘युबीएस बिलेनियर अॅम्बिशन्स रिपोर्ट 2022’ नुसार भारत लवकरच गुंतवणुकीचा गड होऊ शकतो. अहवालानुसार, जगभरातील अब्जाधीश आपले अधिकाधिक पैसे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये गुंतवू इच्छितात. कारण, इथली अर्थव्यवस्था मजबूत तर आहेच, पण त्यांना अनुकूलही आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतातही अब्जाधीशांच्या संख्येत वाढ होत आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्धसंघर्ष आणि कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत झाली असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मात्र सर्वप्रकारच्या आव्हानांचा सामना करून वेगाने पुढे जाताना दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अर्थविषयक, उद्योगविषयक, गुंतवणूकविषयक धोरणांनी भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलीच बळकटी मिळाली असून, परकीय गुंतवणुकदारांची भारतात गुंतवणूक करण्याची रुची वाढत आहे. रशिया-युक्रेन संकट आणि कोरोना काळात जगभरातील अब्जाधीशांसाठी भारत एक प्रमुख गुंतवणूकस्थळ म्हणून समोर आला आहे. चालू महिन्यात जारी झालेल्या ‘युबीएस बिलेनियर अॅम्बिशन्स रिपोर्ट 2022’ नुसार भारत लवकरच गुंतवणुकीचा गड होऊ शकतो. अहवालानुसार, जगभरातील अब्जाधीश आपले अधिकाधिक पैसे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये गुंतवू इच्छितात. कारण, इथली अर्थव्यवस्था मजबूत तर आहेच, पण त्यांना अनुकूलही आहे. सदरचा अहवाल 75 बाजारांत 2500 पेक्षा अधिक अब्जाधीशांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. यात 58 टक्के अब्जाधीशांनी गुंतवणुकीसाठी निवड केलेल्या बाजारांत भारत आणि दक्षिण-पूर्व आशियाचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतातही अब्जाधीशांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या वर्षी भारतात 140 अब्जाधीश होते, तर आता त्यांची संख्या वाढून 166 इतकी झाली आहे.
गुंतवणुकीसाठी भारताला पहिली पसंती देण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेचे जगातले स्थान महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने नुकतेच ब्रिटनला पछाडत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. एकेकाळी ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेल्या देशाने आज ब्रिटिशांनाच अर्थव्यवस्थेच्या व्यापकतेत मात देणे नक्कीच ऐतिहासिक घटना. यंदाच्या मार्च तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 854.7 अब्ज डॉलर्सची झाली, तर ब्रिटनची अर्थव्यवस्था 816 अब्ज डॉलर्सवर थांबली. एका दशकाआधी भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11व्या क्रमांकावर होता, तर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर. पण, सप्टेंबर 2022 मध्ये भारताने ब्रिटनला मागे सोडले. चालू आर्थिक विकास दराच्या हिशोबाने तर भारत 2027 मध्ये जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला पछाडून चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज आहे. इतकेच नव्हे, तर 2029 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून तिसरी सर्वांत मोठी आर्थिक सत्ता होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजेच, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून वाढल्याचे या सगळ्यातून दिसून येते. त्यासाठी त्यांनी नवनवीन योजना आखल्या, उपक्रम राबवले, किचकट कायदे रद्द केले, उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिले, सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योजकांसाठी कर्ज, अनुदान सुविधा पूर्ण क्षमतेने दिले. त्यातूनच भारतीय अर्थचक्राचा गाडा सुरळीत चालू लागला. त्याने कोरोनाचा तडाखा सहन केला अन् आता भारत गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची आणखी एक उपलब्धी म्हणजे ‘स्टार्टअप’ परिसंस्था. नरेंद्र मोदींनी देशाचा कारभार हाती घेतल्यानंतर देशात नवउद्योजक घडवण्यासाठी कंबर कसली. नवउद्योजकांसाठी मोदींनी ‘स्टार्टअप इंडिया’ योजना सुरू केली, जेणेकरून ज्यांना उद्योगाची परंपरा नाही, ते युवकही उद्योग सुरू करू शकतील. त्यामुळेच आज भारतात दरवर्षी सुरू होणार्या ‘स्टार्टअप्स’ची संख्या प्रचंड आहे. मात्र, ‘स्टार्टअप्स’च्या जगात झेंडा फडकावल्यानंतर भारत आता उगवत्या युनिकॉर्नमध्ये अव्वल क्रमांक पटकावण्याच्या दिशेने पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तीशः व सरकारी पातळीवर मिळणार्या प्रोत्साहनाने भारताचे नवे ‘युनिकॉर्न’ स्टार्टअप जगात नवनवी शिखरे पादाक्रांत करत आहेत. आर्थिक वर्ष 2022च्या पहिल्या सहामाहीत देशाने ‘युनिकॉर्न’च्या प्रकरणात चीनला पछाडले आहे. यादरम्यान भारतात 14 स्टार्टअप्स ‘युनिकॉर्न’ झाले, तर चीनमध्ये 11. आता तर भारतातीय स्टार्टअप्स ‘युनिकॉर्न’ने शंभरी पार केली आहे. गेल्या वर्षी भारतात 44 स्टार्टअप्सने ‘युनिकॉर्न’चा पल्ला गाठला आणि यंदाच्या सप्टेंबरमध्ये देशाला 22 ‘युनिकॉर्न’ मिळाले. भारतात सप्टेंबर 2022मध्ये स्टार्टअप ‘युनिकॉर्न’ची संख्या वाढून 107 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे, यातले 60 ‘युनिकॉर्न’ केवळ गेल्या दोन वर्षांत तयार झाले आहेत. यावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने भारताचे उद्यमशील युवक आता नोकरी मागणार्यांऐवजी नोकरी देणारे होत असल्याचे दिसते. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय ‘स्टार्टअप’ जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत.
भारतात गुंतणवूक करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे, स्वस्ताई. वर्ष 2022 मध्ये सर्वात कमी निर्मिती खर्च असणार्या देशांच्या यादीत भारताने पहिला क्रमांक मिळवला आहे, तर चीन आणि व्हिएतनाम भारतानंतर दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहेत, तर बांगलादेश सहाव्या क्रमांकावर आहे. कोणताही गुंतवणूकदार अथवा उद्योजक आपला निर्मितीखर्च कमीत कमी कसा राहील, याकडे अधिकाधिक लक्ष देत असतो. त्या दृष्टीने भारत किफायतशीर असल्याचा अनुभव जागतिक गुंतणवूकदारांना येत आहे. कारण, जगातील सर्वात स्वस्त आणि कमी खर्चाने वस्तू निर्मिती होणार्या देशात भारताला 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. यामुळे भारताच्या निर्मिती क्षेत्राला चालना मिळत असून परकीय कंपन्याही भारतात येतील. खरे म्हणजे ‘युएस न्यूज अॅण्ड वर्ल्ड’ने एक सर्वेक्षण अहवाल तयार केला असून, त्यात 85 देशांत भारत समग्र सर्वश्रेष्ठ देशांच्या यादीत 31व्या क्रमांकावर आहे. याव्यतिरिक्त या यादीत भारताला ‘ओपन फॉर बिझनेस’ श्रेणीत 37व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. तथापि, ‘ओपन फॉर बिझनेस’च्या उपश्रेणींतर्गत सर्वात स्वस्त निर्मिती खर्चात भारताने 100 टक्के गुण मिळवले आहेत. म्हणजेच, भारतात गुंतवणूक केल्यास, इथे उद्योग उभारणी केल्यास कमी खर्चात काम होईल, याची शाश्वती उद्योजकांना मिळत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास, गुंतवणूकादारांचा ओढा साहजिकच भारताकडेच राहणार, यात शंका नाही. ‘युबीएस बिलेनियर अॅम्बिशन्स रिपोर्ट 2022’ मधील आकडेवारीनुसार म्हणूनच जगातील अब्जाधीशांकडून भारतालाच गुंतवणुकीसाठी द्यपसंती दिली जात आहे.