भेसळयुक्त नरेटिव्ह नव्हे शौर्याचा इतिहास सांगणार : नरेंद्र मोदी
27-Dec-2022
Total Views | 35
Narendra Modi
भेसळयुक्त नरेटिव्ह नव्हे शौर्याचा इतिहास सांगणार
वीर बालदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : कोणताही देश त्याच्या मूलभूत तत्वांमुळे ओळखला जातो. भारतात अनेक दशके भेसळयुक्त नरेटिव्ह असलेला इतिहास सांगण्यात आला. आता मात्र स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेचे सर्व अंश निपटून काढण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता शौर्याचा इतिहास सांगितला जाणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. वीर बालदिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, अर्जुन राम मेघवाल, मीनाक्षी लेखी आदी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोणताही देश त्यांच्या मुलभूत तत्वांमुळे ओळखला जातो. जेव्हा देशाची मूळ मूल्ये बदलत असतात तेव्हा देशाचे भवितव्य कालानुरुप आकार घेते. या भूमीच्या इतिहासाबद्दल स्पष्टता असणारी तरुण पिढी असेल तरच ही मूल्ये जतन करता येतील. मात्र, भारतामध्ये अनेक दशके इतिहासाच्या नावावर ‘भेसळयुक्त नेरेटीव्ह’ सांगितले गेले. त्याद्वारे देशवासियांच्या मनात भारतीयत्वाबद्दल न्यूनगंडाची भावना निर्माण केली. प्रगती करण्यासाठी भूतकाळात झालेल्या या इतिहासाच्या संकुचित अन्वयार्थापासून दूर जाण्याची गरज आहे. नवीन भारत गेल्या काही दशकांपासूनच्या चुका सुधारत आपल्या खूप वर्षांपूर्वीपासून गमावत चाललेल्या परंपरेची पुनर्स्थापना करत आहे, असे पंतप्रधानांनी आश्वासन दिले.
भारत आज पहिला वीर बाल दिन साजरा करत असून हा दिवस जे देशासाठी एक नवी सुरुवात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हुत्मात्मा सप्ताह आणि वीर बाल दिवस म्हणजे केवळ एक भावनिक प्रसंग नसून तो आपल्या सर्वांसाठी अमर्याद प्रेरणेचा स्त्रोत आहे. आत्यंतिक शौर्य आणि आत्मसमर्पणाची वेळ येते तेव्हा वय हा मुद्दा महत्त्वाचा नसतो याची आठवण हा वीर बाल दिन आपल्याला करून देईल. हा दिवस आपल्याला शीख पंथाच्या दहा गुरूंनी देशासाठी प्रचंड योगदान आणि देशाच्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी आत्मार्पण करण्याच्या शीख परंपरेची आठवण करून देईल, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.