हे ‘विश्व’ची माझे घर...

    18-Dec-2022   
Total Views |
Vishwanath Bivalkar

‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीनुसार आपल्या घरापलीकडे जाऊन तरुणाईला, सर्वसामान्य नागरिकांना सजग करण्याचे काम करणार्‍या विश्वनाथ बिवलकर यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...


विश्वनाथ बिवलकर यांचा जन्म अंबरनाथ येथे झाला. त्यांचे संपूर्ण बालपण डोंबिवलीत गेले. त्यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील सेंट मेरी इंग्लिश स्कूल या शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी प्रगती महाविद्यालयातून पूर्ण केले. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून पुणे विद्यापीठातून ‘एम.कॉम’ ही पदवी मिळविली. शिक्षण सुरू असतानाच ते ‘युपीएससी’ आणि ‘एमपीएससी’सारख्या शासकीय स्पर्धा परीक्षांसाठीही प्रयत्नशील होते. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. ‘एम. कॉम’ झाल्यानंतर त्यांनी ‘मानव संसाधन व्यवस्थापन’ या क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला. पुढे २००५ साली त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी तब्बल १५ वर्षं एका ‘मल्टिनॅशनल’ कंपनीत नोकरी केली.

पण, विश्वनाथ यांना लोकांशी असे ‘कनेक्टेड’ राहायला जास्त आवडते. त्यामुळे त्यांनी ‘मानवी संसाधन व्यवस्थापन’ (एचआरएम) या क्षेत्राची निवड केली होती. जेणोकरून त्यांना अधिकाधिक लोकांच्या संपर्कात राहता येईल, त्यांच्या समस्या जाणून घेता येईल आणि त्यांच्या अडचणीही सोडविला येतील. १५ वर्षं नोकरी केल्यानंतर विश्वनाथ यांनी स्वत:चे ‘स्टार्टअप’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या एका वर्षांपासून ते या स्टार्टअपवर कार्यरत आहेत. त्यांची ही कंपनी ठाण्यात आहे.
विश्वनाथ यांना सामाजिक कार्याचीही तेवढीच आवड असल्याने त्यांनी २०१० साली ‘इगल ब्रिगेड फाऊंडेशन’ची स्थापना केली. कला, क्रीडा, मुलाखत तंत्राद्वारे मुलांना मार्गदर्शन करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. पोलिसांसाठी ध्यानधारणा, अशासकीय व शासकीय कर्मचार्‍यांसाठी ‘प्राणिक हिलिंग’ हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून ते यशस्वीरीत्या राबवित आहेत.

 विश्वनाथ हे ‘रोटरी क्लब ऑफ व्हिनर्स’ या संस्थेचे ‘ऑनररी मेंबर’ही आहेत. तसेच विश्वनाथ हे गेल्या २० वर्षांपासून प्रगती महाविद्यालयाशी जोडलेले आहेत. तसेच, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’तर्फे ‘सायबर क्राईम’ संदर्भात जनजागृती केली जाते. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही तरुणाईला ‘सायबर क्राईम’चे सर्व दुष्परिणाम माहीत नसतात. त्यामुळे तरुणाईमध्ये या विषयाची विश्वनाथ यांच्याकडून व्यापक पातळीवर जनजागृती केली जाते. तसेच नागरिकांना सुरक्षेसाठी ‘ओटीपी’ नंबर कोणालाही सांगू नका, याविषयी या जनजागृतीत प्रामुख्याने भर दिला जातो. पण, बहुतेक वेळा नागरिक पटकन सांगून टाकतात आणि त्यांची फसवणूक होते. त्यासाठी संस्थेतर्फे जनजागृती केली जाते, अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसण्यासाठी त्यांची संस्था काम करीत आहे. तसेच पेट्रोलिंगचे कामही संस्थेतर्फे केले जात होते.

मात्र, ‘कोविड’ काळामध्ये हे काम बंद करावा लागले. कारण, सामाजिक अंतर राखणे शक्य होत नव्हते. तरुणांमध्ये सकारात्मक बदल घडावा, यासाठी विश्वनाथ यांची संस्था प्रयत्नरत आहे. तरुणांना कोणत्याही व्यसनांच्या, अमलीपदार्थांच्या आहारी जाऊ नका किंवा जोशात कोणताही निर्णय घेऊ नका, हे पटवून देण्याचे, त्याविषयी समुपदेशनाचे कामही संस्थेच्या माध्यमातून केले जाते. त्याचबरोबर अनेकदा तरुणांवर एखादी छोटीशी केस जरी असली, तरी त्यांना रोजगारापासूनसुद्धा वंचित राहावे लागते. त्याविषयी सुद्धा तरुणांना मार्गदर्शन केले जाते. आपणच दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक गुन्हे घडतात, याविषयी सुद्धा नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. तरुणाई अमलीपदार्थांच्या विळख्यात जाऊ नये, यासाठी व्यापक पातळीवर जनजागृती केली जाते. पण, विश्वनाथ याविषयी बोलताना सांगतात की, “केवळ जनजागृती करून काहीच उपयोग नाही. त्यासाठी सातत्याने काम करावे लागणार आहे.”

माणूस जेवढा प्रगती करतो, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणामदेखील आपल्याला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे मुलांनो, आई-वडिलांना कुठे जात आहात हे घरी आवर्जून जा. विश्वासातील मित्रांसोबतच बाहेर जा, असा सल्ला विश्वनाथ तरुणपिढीला देतात.विश्वनाथ हे तसे अभ्यासात अगदी सर्वसाधारण होते. ते मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे तसा शालेय जीवनात त्यांना फारसा संघर्ष करावा लागला नाही. विश्वनाथ यांचे वडील मधुसुदन हे सैन्यदलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ‘बीएसएनएल’मध्ये काम केले. त्यांचे वडील सैन्यात असल्याने साहजिकच त्यांची शिस्त कडक होती. विश्वनाथ यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. विश्वनाथ हे ‘बी.कॉम’च्या पहिल्या वर्षाला असताना त्यांचे सर्व मित्र बाईक घेऊन कॉलेजला येत असत.

 मात्र, त्यांच्या वडिलांनी त्यांना सायकलच वापरण्याचा सल्ला दिला. त्यांच्या वडिलांच्या मते, “आम्ही तुमच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू. अभ्यासासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी पुरवू. पण बाईक वगैरे या गोष्टी तुम्ही तुमचे कमवा आणि विकत घ्या,” असे सांगितले. त्यामुळेच आपण आजतागायत कधीच बाईक चालवू शकलो नाही, असे विश्वनाथ सांगतात. त्यांच्या आई शोभना या शाळेत शिक्षिका होत्या. अंबरनाथ येथील मदनसिंग मेमोरियल हायस्कूल या शाळेत त्या शिक्षिका होत्या. विश्वनाथ यांना अनेक गोष्टी आई पुरवित असे. वेळप्रसंगी त्यांनी पोटाला चिमटा काढून त्या वस्तू विश्वनाथ यांना घेऊन देत. विश्वनाथ यांना एक मोठी बहीण आहे. तिचे लग्न झाले असून ती सध्या ठाण्यात वास्तव्यास असते.अशा या विश्वनाथ बिवलकर यांना ‘रोटरी क्लब’तर्फे त्यांच्या समाजकार्यासाठी ‘एक्सलेन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे, तर ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’तर्फे ‘ग्रेट डोंबिवलीकर’ पुरस्काराने डोंबिवलीकरांना सन्मानित केले जाते. अशा या सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देऊन काम करणार्‍या या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.