केरळ सरकारवर ताशेरे

    03-Nov-2022   
Total Views |
 

पिनराई विजयन
 
 
 
 
मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि राज्यपालांमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे तूर्त दिसत नाही. केरळ सरकारने आपल्या चुका सुधारण्याऐवजी थेट राज्यपाल आणि राजभवनावरच हल्लाबोल केला. विजयन सरकारने राजभवनावर सरकारमध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. त्यावर राज्यापालांनीही आक्षेप घेत “जर केरळ सरकारने हे आरोप सिद्ध केले आणि राजभवन हस्तक्षेप करत असल्याचे एक उदाहरण दाखवून दिले, तर राज्यपाल पदाचा राजीनामा देईन,” असे ठणकावून सांगितले आहे.
 
 
 
दरम्यान, राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी मुख्यमंत्री विजयन यांच्याद्वारे विश्वविद्यालयांमध्ये करण्यात आलेल्या कुलपतींच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. मात्र, याला विजयन हे राजकीय हस्तक्षेप समजून बसले. त्यावर राज्यपालांनी सांगितले की, “विजयन यांना वाटत असेल की रा. स्व. संघाच्या लोकांना पुढे आणण्यासाठी मी माझ्या अधिकारांचा वापर करून कुणा एका रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकाला नामित केले असेल तर राजीनामा देईन.” परंतु, हे विजयन यांनी सिद्ध केले नाही तर ते राजीनामा देणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे विश्वविद्यालयांमध्ये कमी शिकलेल्यांना आणि त्यांच्या नातेवाईंकाना भरती करून शिक्षण क्षेत्रात कशी सुधारणा करणार, असा प्रश्नही राज्यपालांनी विजयन यांना विचारला आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव आल्यानंतर राज्यपालांनी केरळ सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
 
 
 
 तस्करी प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच संरक्षण मिळत असेल, राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक यामध्ये सहभागी असतील तर मला हस्तक्षेप करावाच लागेल, असे राज्यपालांनी खडसावून सांगितले. सर्वांसाठी एकच लक्ष्मण रेखा असून ती केरळ सरकार पार करत आहे. त्यामुळे विश्वविद्यालयांच्या कुलपतींच्या नियुक्तीसंदर्भातील फाईल परत पाठवल्या आहेत. विजयन आणि खान यांच्यातील संघर्षाची ही पहिली वेळ नाही. याआधीही राज्यपालांनी दारू विक्रीला प्रोत्साहन देण्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी केरळच्या विकासासाठी दारू आणि लॉटरी ठीक असल्याचा टोमणा मारला होता. केरळ सरकारच्या उन्मत्त शासनाला आरिफ खान यांनी वेळोवेळी लगाम घातला. लोकशाहीच्या नावाने गळे काढणार्‍यांना राज्यपालांनी योग्य आरसा दाखवला हे मात्र बरे झाले!
 
काँग्रेसची ‘बुमरँग’ यात्रा
 
 
 
कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. जोशात असलेल्या काँग्रेसने त्याची तयारीही सुरू केली. पायी चालण्यापासून आणि जमिनीपासून दुरावलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी भले राहुल गांधी रस्त्यावर उतरले असले तरीही त्यात त्यांना कितपत यश येईल, हे येणारा काळच ठरवेल. परंतु, तुर्तास तरी राहुल यांची यात्रा त्यांच्यावरच ‘बुमरँग’ होताना दिसून येत आहे. ही यात्रा कर्नाटकात असताना यात्र ज्या भागातून गेली तिथे विविध महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या.
 
 
 
या निवडणुकांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण कर्नाटकातील चामराज नगर जिल्ह्यातील कोल्लेगल नगरपालिका पोटनिवडणुकीत सातपैकी सहा जागा भाजपने जिंकल्या. तसेच, पूर्वीचे विजापूर आणि आताचे विजयपूर या महापालिकेची पहिलीवहिली निवडणूकही भाजपने बहुमताने जिंकली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने विजयी झेंडा रोवला, त्याच परिसरातून राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मोठा गाजावाजा करत गेली होती. या यात्रेमुळे कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीशी ऊर्जा आली. परंतु, तिचा काहीही उपयोग झाला नाही आणि काँग्रेसला हार पाहावी लागली. महापालिका आणि पोटनिवडणुकीत या यात्रेचा काडीचाही परिणाम दिसला नाही.
 
 
 
विजापूर महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत एकूण 35 जागांपैकी 17 जागांवर भाजपने विजय मिळवला, तर दोन जागा भाजपच्या बंडखोरांनी व दहा जागांवर काँग्रेसने आणि ‘एआयएमआयएम’ला दोन जागा मिळाल्या. विशेष म्हणजे काँग्रेसने आपल्या खोडीनुसार निवडणुकीत मुस्लीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. विजयपूरमध्ये काँग्रेसने सर्व 35 जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करत त्यापैकी 17 उमेदवार मुस्लीम दिले होते. त्यापैकी सहा उमेदवारच विजयी होऊ शकले. बेळगावातही 18 जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यापैकी नऊ उमेदवार मुस्लीम आहेत, तर कलवरीमध्ये 27 जागा काँग्रेसने जिंकल्या, त्यापैकी 18 उमेदवार मुस्लीम आहेत. ‘मुस्लीम कार्ड’ खेळूनही काँग्रेसला हार पत्करावी लागली. याहीपलीकडे राहुल यांची ‘भारत जोडो’ यात्राही काँग्रेसचा पराभव रोखू शकली नाही. त्यामुळे भविष्यात या यात्रेने काय होईल, याची छोटीशी चुणूक या निकालाने पाहायला मिळाली.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.