मुंबई : नाशिक बस दुर्घटना प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. देशाच्या पंतप्रधानांकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी आणि जखमींसाठी मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याबाबत ट्विट करून ही घोषणा करण्यात आली आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, 'नाशिक इथे झालेल्या बस अपघाताचे वृत्त व्यथित करणारे आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे वाटू दे ही प्रार्थना. अपघातातील पीडितांना स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. नाशिक बस आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरफमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.' अशी घोषणा पंतप्रधानांकडून करण्यात आली आहे.
नाशिक येथे झालेल्या बस आणि कंटेनरच्या अपघातानंतर बसला आग लागल्याची दुर्घटना शनिवारी पहाटे घडली. या अग्निकांडात बसमधील १२ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जळालेल्या बसची पाहणी केली असून जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.