पुणे : पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यांवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर शांतता पाहायला मिळाली. तथापि सायंकाळपासून मात्र फटाक्यांच्या आतषबाजीत अवघे पुणे उजळून निघाले. घरोघरी आनंदात लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला गेला. रांगोळी, पणत्या, झेंडू-शेवंतीसह अनेक प्रकारची फुलांची सजावट करुन तसेच आकाशदिवे आणि घरांवर रंगबेरंगी लाईटिंगच्या माळांच्या सजावटीने यानिमित्त भर पडल्याचे पहायला मिळाले.
उत्सवप्रिय पुणेकरांनी लक्ष्मीपूजन थाटात साजरे केले. यावेळी आवाजांच्या फटाक्यांपेक्षा पर्यावरणपूरक फटाक्यांना पसंती दिली.
यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यामुळे सकाळपासून घरोघरी अभ्यंगस्नान आणि फराळावर ताव असा बेत दिसून आला. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. शिवाय सोशल मीडियावरदेखील शुभेच्छांचे सकाळपासूनच आदानप्रदान केले जात होते.
यंदा लांबलेल्या पावसाने बाजारात फुलांचे प्रमाण कमी आणि विक्री चढ्या दराने सुरू होती. मात्र, रविवारपासून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. लक्ष्मीपूजनासाठी ठिकठिकाणी झेंडूच्या फुलांचे तोरण, लक्ष्मीची मूर्ती, केरसुणी, लाह्या बत्तासे आणि इतर पूजा साहित्याचे स्टॉल दिसून आले. मध्यवर्ती पुण्याबरोबरच उपनगरांमधील बाजारपेठेमध्ये गर्दी बघायला मिळाली.
पुणेकरांनी लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधून आपल्या आवडीच्या वस्तूंची जोमात खरेदी केली आहे. वाहन आणि सोने-चांदी खरेदीत विक्रमी वाढ झाली असून यंदा थाटात लक्ष्मीपूजन पार पडले.
दिवाळीच्या पूर्वसंध्येवर बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या होत्या. व्यापार्यांनीदेखील ग्राहकांना आवश्यक असलेल्या विविध वस्तूंची उपलब्धता करुन दिल्याने बाजारपेठेत खरेदीचा जोर दिसून आला. सोने-चांदीचे दागिने तसेच आवडीची वाहने खरेदीसाठी अधिक पसंती दिली.
ऑक्टोबर महिन्यात दसर्यापासून आतापर्यंत जवळपास 18 हजारांहून अधिक वाहनांची खरेदी पुणेकरांनी केल्याची नोंद आरटीओ कार्यालयात झाली आहे. यात 12 हजार दुचाकी, तर 4,500 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक्स’ वाहनांनादेखील यंदा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
तरुणांनी मोबाईल आणि लॅपटॉप, तर महिलावर्गाकडून फ्रीज आणि वॉशिंग मशीनला सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. ’इलेक्ट्रॉनिक्स’ व्यापारात 25 टक्क्यांंनी वाढ झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले. ‘होम थिएटर’, ’मिक्सर’, ’वॉटर प्युरिफायर’, ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ तसेच ’व्हॅक्युम क्लिनर’ला काळाच्या गरजेनुसार ग्राहकांनी पसंती दिली. ‘स्मार्ट टीव्ही’कडेदेखील ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून आला.
सोने-चांदी खरेदीला पसंती
दिवाळीच्या निमित्ताने सराफा बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीला पुणेकरांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकांनी दागिन्यांच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिले. धनत्रयोदशी दिवशी 150 कोटींची उलाढाल झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांत 22 कॅरेट सोने 47 हजार, 630 आणि 24 कॅरेट सोने 50 हजार, 770 प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचा दरदेखील 58 हजार किलोच्या आसपास होता.
याबाबत ’पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “जागतिक पातळीवरील अस्थिरतेने सोन्याच्या भावावर परिणाम होतो. जगातील युद्धजन्य परिस्थिती चिघळत गेल्यास सोन्याचे भाव पुन्हा वाढतील. मात्र, आता सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे नागरिकही सोन्याची खरेदी करत असून गुंतवणुकीवर भर देत आहेत.
भारतामध्ये सध्या तरी मंदीचे वातावरण नाही, त्यामुळे ग्राहकांना संधी मिळाली असून ते उत्साहाने सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात चांगली स्थिरता असून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी दागिन्यांसह हिरे आणि रत्न खरेदीसाठीदेखील पसंती दर्शविली. विशेषतः दिवाळीत नावीन्यपूर्ण हिर्यांच्या दागिन्यांच्या खरेदीकडे ओढा वाढला आहे.‘’