भाजप युवा मोर्चात खांदेपालट ; प्रदेशाध्यक्ष पदी राहुल लोणीकर यांची निवड

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने महत्त्वाचे फेरबदल

    15-Oct-2022
Total Views |
 
Rahul-Lonikar-BJYM_
 
 
 
मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यानंतर संघटनेत महत्त्वपूर्ण बदलांना सुरुवात झाली आहे. भाजपच्या युवा मोर्चातही खांदेपालट करण्यात आले असून युवा मोर्चाची नव्याने बांधणी करण्याची तयारी भाजपने केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भाजप युवा मोर्चात खांदेपालट करण्यात आला असून प्रदेशाध्यक्ष पदी राहुल लोणीकर यांची निवड केल्याचे जाहीर केले आहे. तसेच भाजयुमोच्या प्रदेश सरचिटणीसपदी तसेच युवा वारीअर्स प्रदेश संयोजकपदी अनुप मोरे यांची देखील नियुक्ती करण्यात आली.
 
 
शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बावनकुळे यांनी ही घोषणा केली. यावेळी लोणीकर यांना प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे पत्र देखील बावनकुळेंच्या हस्ते देण्यात आले. या निवडीवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चाचे मावळते अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित होते. विक्रांत पाटील यांची नुकतीच भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाले होते.
 
 
कोण आहेत राहुल लोणीकर ?
 
भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पदी नव्याने नियुक्त करण्यात आलेले राहुल लोणीकर हे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव आहेत. यापूर्वी त्यांच्यावर युवा मोर्चाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. शनिवारी मुंबईत झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने महत्त्वाचे फेरबदल
 
महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये महापालिका, नगर परिषद - नगरपालिकांसह जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात ३ महिन्यांपूर्वी भाजपने सत्तेत पुनरागमन केल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये मिनी विधानसभा म्हणून पाहिले जाते, ज्या पक्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वरचष्मा राहतो त्यांची ग्रामीण महाराष्ट्रावर पकड मजबूत समजली जाते.
 
 
मागील काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भक्कम स्थितीत होती, परंतु २०१४ मधील सत्ताबदलानंतर राष्ट्रवादीला घरघर लागली आणि त्याजागी पश्चिम महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणी ग्रामीण राजकारणात भाजपने आपला प्रभाव वाढवल्याचे दिसून आले होते. त्यामुळे भाजप आणि युवा मोर्चामध्ये होत असलेले संघटनात्मक बदल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे मानले ठरू शकतात.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121