लंडन : डिजिटल जमान्यात तुम्हाला अगदी फिट अॅण्ड फाईन ठेवणारे स्मार्टवॉचचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काटे असणारी घड्याळं आता कालबाह्य होतील की काय, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना महामारीच्या मानसिक तणावातून मुक्त करण्यासाठी लंडनमध्ये 'नोवॉच' कंपनीने अनोखे स्मार्टवॉच तयार केले आहे. मानसिक तणावाबद्दलची माहिती वेळेपूर्वीच आपल्याला मिळणार असल्याने त्यावर उपाय करणेही शक्य होणार आहे.
कसे काम करते नोवॉच?
मानसिक तणावाची पातळी वाढण्यापूर्वी तासभर पूर्वीच सर्तक करणाऱ्या 'नोवॉच'मुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. हे नोवॉच शरीरातून येणाऱ्या घामाच्या माध्यमातून 'कॉर्टिसॉल' या 'स्ट्रेस हॉर्मोन'चा मागोवा घेते. त्यानंतर शरीरात त्याची पातळी वाढल्यास मनगटावर कंपन करून सतर्क करते. ऑडिओ संदेशाद्वारे व्यक्तीला चालण्याचा सल्ला दिला जातो. कॉर्टिसॉल हे लठ्ठपणा, निद्रानाश आणि हृदयविकाराचे कारण ठरू शकते.
कशी मोजली जाते तणावाची पातळी?
ताणतणावाबद्दल आकडेवारी प्रदर्शित करुन व्यक्तीला आणखी ताण देण्यापेक्षा यात सोपा मार्ग वापरला आहे. यासाठी नोवॉचमध्ये डिस्प्ले फीचर दिलेलाच नाही. यात आरोग्यासंदर्भात डेटा संचयित होतो परंतु तो वापरकर्त्यास त्वरित दर्शवला जात नाही. गाडी चालवताना गाडीच्या डॅशबोर्डला ते जोडल्यास तणावाची पातळी मोजली जाऊ शकते, असे कंपनीने सांगितले. लास व्हेगस येथे होणाऱ्या सीईएस परिषदेत ते प्रदर्शित केले जाणार असून बाजारात याची किंमत ५७ हजार रुपये इतकी असेल.
'डोंट लुक अप' चित्रपटात 'नोवॉच'ची झलक
नेटफ्लिक्सवरच्या 'डोंट लूक अप' या चित्रपटात नोवॉचप्रमाणेच तणावाबद्दल माहिती देणारे एक उपकरण वापरले आहे. यात इलेक्ट्रोडर्मल सेन्सर्सचा वापर केला असून याद्वारे शरीराचे तापमान, रक्तातील ऑक्सिजन पातळी आणि श्वासोच्छवासाच्या गतीवरही लक्ष ठेवता येते.