मुंबई : आय.आय.टी विषयात शिक्षण घेण्याऱ्या अनेक मुलांच्या मानसिकतेत सध्या तणावाचे प्रमाण वाढत चालले आहे. आय.आय.टी मुंबईमध्ये शिकणाऱ्या दर्शन मालवीय या २७ वर्षाच्या विद्यार्थ्याने १७ जानेवारी रोजी पहाटे ४:३० वाजता आत्महत्या केली. 'नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे' त्याने पत्रात लिहिले होते.
'राष्ट्रीय शिक्षण संस्थांमधील ही पहिली आत्महत्या नाही, सरकारने अधिक समुपदेशन सत्रांचे आयोजन केले पाहिजे आणि अशा प्रत्येक संस्थेत मानसिक आरोग्य विभाग स्थापन केला पाहिजे,' असे मत अभाविपच्या मुंबई प्रदेश मंत्री गौतमी अहिरराव यांनी व्यक्त केले. 'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपला देश असताना अशा पद्धतीने युवा, विद्याविभूषित विद्यार्थ्यांनी नैराश्यातुन आत्महत्या करणे ही शासनासाठी शरमेची बाब आहे.', असेही त्या म्हणाल्या.
'आय.आय.टी सारख्या प्रतिष्ठित, नावाजलेल्या शिक्षण संकुलातील विद्यार्थ्याने अश्याप्रकारे आत्महत्या करणे हे धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांनी अशी टोकाची पाऊले उचलायला नको. या संपूर्ण घटनेची पोलिसांकडून चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.', असे अभाविप कोकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी सांगितले.
यावेळी अभाविप राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार यांनीही या दुर्दैवी घटनेसंदर्भात बोलताना आपले मत व्यक्त केले. 'कोरोना काळात कित्येक विद्यार्थी हे मानसिकरित्या अस्वस्थ आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या एकूण मानसिक स्थिती संदर्भात विविध महाविद्यालय, शिक्षण संस्था आणि राज्य शासनाने विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जात नसताना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.", असे त्यांनी सांगितले.